स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल जवळपास वर्षभरानंतर व्यावसायिक टेनिसमध्ये परतला आहे. दुखापतीमुळे तो गेल्या एक वर्षापासून या खेळापासून दूर होता. जानेवारी 2023 मध्ये त्याला हिप दुखापत झाली आणि त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. दुखापतीनंतर तो प्रथमच ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता. मात्र, पुरुष दुहेरीच्या सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.
तो 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीत व्यस्त आहे. नदाल आणि त्याचा साथीदार मार्क लोपेझ यांचा ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन यांनी 6-4, 6-4 असा पराभव केला. जॉर्डनने नदालच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, राफेलला पुन्हा कोर्टवर पाहून खूप छान वाटत आहे. मी एकेरीमध्ये अनेकवेळा हरलो आहे, त्यामुळे दुहेरीच्या कोर्टात त्याला पराभूत करणे चांगले वाटले.
22 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल मंगळवारी ब्रिस्बेन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या लढतीत डॉमिनिक थिमविरुद्ध खेळेल . या सामन्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियन ओपनची तयारी मजबूत होईल.