भारतीय बॅडमिंटन स्टार दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने सय्यद मौदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तिने अमेरिकेच्या लॉरेन लॅमचा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला. सिंधूला या स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले असून, तिने याच पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत शानदार विजय नोंदवल्यानंतर सिंधूने दुसरी फेरीही सहज जिंकली.
भारतीय खेळाडूने अमेरिकन प्रतिस्पर्ध्यावर अवघ्या 33 मिनिटांत विजयाची नोंद केली. तिने लॉरेन लॅमचा 21-16,21-13 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तिने तान्या हेमंतचा 21-9, 21-9 असा पराभव केला.
शेवटच्या आठमध्ये सिंधूचा सामना सुपानिदाशी होणार आहे . थायलंडच्या सुपानिदाला या स्पर्धेत सहावे मानांकन मिळाले आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या सामिया इमाद फारुकीने कनिका कंवलचा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. तिने कनिकाचा 21-6, 21-15 असा पराभव केला. आता शेवटच्या आठमध्ये फारुकीचा सामना अनुपमा उपाध्यायशी होणार आहे. अनुपमाने स्मित तोष्णीवालचा 21-12, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.