Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताला मेडल्स कोण मिळवून देऊ शकतं?

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताला मेडल्स कोण मिळवून देऊ शकतं?
, गुरूवार, 22 जुलै 2021 (23:14 IST)
अँड्र्यू क्लॅरन्स
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतानं आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू पाठवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पदकसंख्येमध्ये सुधारणा करून अधिक पदकं जिंकण्याची आशा यंदा भारताला आहे.
 
ऑलिम्पिकमध्ये भारताचे 120 क्रीडापटू 58 क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमध्ये भारताला यंदा पदकाची आशा आहे.
 
रिओ इथं 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावं लागलं होतं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं महिला एकेरीत रौप्य मिळवलं होतं, तर कुस्तीपटू साक्षी मलिक हिनं 58 किलो वजन गटात फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली होती.
यावेळी भारतीय क्रीडापटू दोन नव्या क्रीडाप्रकारांसाठी पात्र ठरले आहेत. भवानी देवी प्रथमच फेन्सिंग (तलवारबाजी) साठी पात्र ठरल्या आहेत. तसंच फवाद मिर्झा यांनी प्रथमच इक्वेस्ट्रीयन (अश्वारोहण) प्रकारात ऑलिम्पिकचं तिकिट मिळवलं आहे.
 
नेमबाजी (शूटिंग)
भारताला पदकांची सर्वात मोठी आशा ही 15 सदस्यांचा समावेश असलेल्या नेमबाजीच्या पथकाकडून आहे. भारताच्या काही नेमबाजांवर सगळ्यांची नजर असणार आहे.
 
भारताच्या सर्वाधिक अपेक्षा या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या दोघांकडून आहेत.
भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या दोन नेमबाजांनी नवी दिल्लीच्या करणी सिंह शूटिंग रेंज इथं झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मिश्र श्रेणीत त्यांनी या पदकाची कमाई केली होती.
 
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये भारताची 19 वर्षीय मनू भाकेर ही पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिनं यापूर्वी शुटिंग वर्ल्ड कप, राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धा आणि युथ ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला आणि युथ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या सौरभ चौधरीवरही अनेकांच्या नजरा असतील. 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये वयाच्या 16 व्या वर्षी त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली होती. सर्वात कमी वयात ही कामगिरी करणारा नेमबाज तो ठरला होता.
 
त्यामुळं भाकेर आणि चौधरी हे दोघंही 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारातील पदकाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. या प्रकारात या जोडीनं पाच वेळा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तसंच जूनमध्ये क्रोएशिया इथं झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी रौप्य पदक मिळवलं आहे.
 
बॅडमिंटन
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 21 वर्षांच्या पी.व्ही.सिंधू हिनं रौप्य पदकाची कमाई करत कोट्यवधी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं होतं. त्यावेळी तिच्याकडून पदकाची फारशी अपेक्षा नव्हती. मात्र आता पाच वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेत तिच्याकडून सर्वांनाच मोठ्या आशा आहेत.
"मी त्यावेळी केवळ एक सहभागी स्पर्धक होते. पण आता प्रत्येक जण सिंधूनं पदक आणायलाच हवं, असं म्हणत आहे," असं सिंधूनं नुकतंच बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं.
 
पी.व्ही.सिंधू हिला गेल्या वर्षी पहिल्या वहिल्या 'बीबीस स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' या सन्मानानं गौरवण्यात आलं आहे.
 
2019 मध्ये ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची विजेती ठरली. पण त्यानंतर तिच्या खेळात सातत्य नसल्याचं पाहायला मिळालं आहे. तसं असलं तरी पदकाची आशा असलेल्या भारताच्या आघाडीच्या सद्स्यांमध्ये तिचा समावेश आहे.
 
बॉक्सिंग
मॅग्निफिशिअंट मेरी, आयर्न लेडी आणि अशा अनेक इतर नावांनी प्रसिद्ध असलेली बॉक्सर मेरी कोम हिच्याकडूनदेखील भारतीय चाहत्यांना पदकाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
लंडनमध्ये झालेल्या 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कांस्य पदकाची कमाई केली होती. आता या स्पर्धेत सुवर्ण किंवा किमान रौप्य जिंकण्याची मेरीची इच्छा असणार आहे. मेरी 51 किलो वजन गटात फ्लायवेट प्रकारात सहभागी होणार आहे.
 
दुबईमध्ये मे महिन्यात झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझिम कायझायबे हिनं तिचा पराभव केला होता.
 
मेरी कोम 38 वर्षांची आहे. त्यामुळं कदाचित ही स्पर्धा तिची अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असू शकते. त्यामुळं मेरीनं बॉक्सिंग रिंगचा निरोप घेण्यापूर्वी तिच्या पदकांच्या यादीत ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचा समावेश असावा, यासाठी संपूर्ण देशाच्या शुभेच्छा तिला आहेत.
कुस्ती
रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये साक्षी मलिक हिनं कांस्य पदकाची कमाई केल्यानं, काहीसं यश भारताला मिळालं होतं. यावेळी भारताची विनेश फोगाट भारताच्या महिला कुस्ती संघाचं नेतृत्व करतेय.
रिओ ऑलिम्पिकमध्ये अचानक झालेल्या दुखापतीनंतर विनेश फोगाटला व्हीलचेअरवरून भारतात परतावं लागलं होतं. त्यानंतर तिला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं.
 
मात्र 26 वर्षांची विनेश आता 53 किलो वजनगटात भारतासाठी पदक मिळवण्याची प्रमुख दावेदार आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या स्पर्धांमध्ये तिनं चांगलं यश मिळवलं आहे. तसंच क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवलं आहे.
 
"एका क्षणाला मला असं वाटलं होतं की, दुखापतीमुळं माझं करिअर जणू आता संपुष्टात आलं आहे. पण आता मला आणखी एक संधी मिळाली आहे, आणि त्याद्वारे मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे," असं विनेश म्हणाली.
 
भारताच्या कुस्तीच्या पुरुष गटातील बजरंग पुनियावरदेखील यंदा सगळ्यांच्या नजरा आहेत. तीन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवलेला बजरंग पुनिया प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालाय. स्पर्धेत 65 किलो वजन गटातील प्रमुख दावेदारांपैकी तो एक आहे.
भारताची आजवरची ऑलिम्पिकमधील कामगिरी
2016 रिओ ऑलिम्पिक : 1 रौप्य, 1 कांस्य
 
2012 लंडन ऑलिम्पिक : 2 रौप्य , 4 कांस्य
 
2008 बीजिंग ऑलिम्पिक : 1 सुवर्ण, 2 कांस्य
 
भारतानं 1900 पासून आतापर्यंत ऑलिम्पिकची एकूण 28 पदकं जिंकली आहेत. त्यापैकी 11 हॉकीतील, 5 कुस्तीतील, 4 नेमबाजीतील तर बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि अॅथलेटिक्समधून प्रत्येकी दोन आणि टेनिस तसंट वेटलिफ्टींग (भारोत्तोलन) यातून प्रत्येकी एक पदक मिळवलं आहे.
वेटलिफ्टींग (भारोत्तोलन)
टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्तानं मिराबाई चानू हिला पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली आहे. 2016 मध्ये ती पात्र ठरली होती. पण क्लीन अँड जर्क प्रकाराच्या तीन प्रयत्नांमध्ये तिला वजन उचलण्यात यश आलं नाही. त्यामुळं 48 किलो वजन गटातून ती बाहेर पडली.
मात्र 2017 मध्ये तिनं, वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. त्यानंतर वर्षभरातच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदकाची कमाई केली. तसंच 2019 च्या एशियन वेटलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.
 
मीराबाई चानू ही वेटलिफ्टींग प्रकारातील भारतीय पथकातील एकमेव सदस्य आहे. रिओ ऑलिम्पिकमधील चूक सुधारण्याचा प्रयत्न ती नक्कीच टोकियोत करणार आहे.
 
तिरंदाजी
पॅरिस इथं गेल्याच महिन्यात झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी हिनं तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
महिलांच्या रिकर्व्ह प्रकारातील तिरंदाजीच्या जागितक क्रमवारीत सध्या दीपिका अव्वल स्थानी आहे. त्यामुळं टोकियो ऑलिम्पिकमध्येही ती पदकाची प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे.
 
आतापर्यंत झालेल्या विविध विश्वचषक स्पर्धांमध्ये दीपिका कुमारीनं आतापर्यंत 9 सुवर्ण, 12 रौप्य आणि 7 कांस्य पदकांची कमाई केली आहे. आता पदकांच्या यादीत ऑलिम्पिक पदकाचा समावेश करण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना शाळा: तिसऱ्या लाटेचा धोका असताना शाळा सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे का?