Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेस्सीने परिधान केलेला काळा झगा चर्चेत का आहे?

मेस्सीने परिधान केलेला काळा झगा चर्चेत का आहे?
, मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (09:56 IST)
अर्जेंटिनाचं 36 वर्षांचं स्वप्न आपल्या दमदार खेळासह प्रत्यक्षात साकारणाऱ्या मेस्सीने पुरस्कार वितरण सोहळ्यात परिधान केलेल्या काळ्या झग्याची चर्चा आहे.वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीत, राऊंड ऑफ16, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल अशा प्रत्येक टप्प्यात मेस्सीने गोल केले. वर्ल्ड कपमध्ये मेस्सीच्या नावावर 13 गोल आणि 8 गोलसहाय्य आहे. मेस्सीचा अर्जेंटिनासाठी खेळतानाचा 98वा गोल आहे.
कारकीर्दीत अनेक स्पर्धांची जेतेपदं मिळवून देणारा मेस्सीला अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप जिंकून देता आला नव्हता.
 
निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत संपला. जादा वेळेत तिढा सुटला नाही आणि 3-3 बरोबरीच राहिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 अशी सरशी साधली.
अर्जेंटिनाच्या विजयानंतर कॅमेरा मेस्सीच्या चेहऱ्यावर स्थिरावला. मेस्सीच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. मैदानातले अर्जेंटिनाचे चाहते मेस्सीच्या नावाचा जयघोष करत होते. विजयानंतर मेस्सीने सहकाऱ्यांना घट्ट मिठी मारुन आनंद साजरा केला.
 
पुरस्कार वितरण सोहळ्यात मेस्सी दोनवेळा मंचावर आला. त्यावेळी त्याने परिधान केलेला काळा झगा चर्चेत आहे.
 
मेस्सी पहिल्यांदा मंचावर आला त्यावेळी त्याला गोल्डन बॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो.
यानंतर वर्ल्डकप सन्मानचिन्ह स्वीकारण्यासाठी अर्जेंटिनाचे खेळाडू एकेक करुन व्यासपीठावर आले. सगळ्यांना मेस्सीचा प्रतीक्षा होती. मेस्सी सगळ्यात शेवटी मंचावर आला.
 
त्याला सन्मानचिन्ह दिल्यानंतर कतारचे कतारचे शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी मेस्सीला एक काळा झगा परिधान करायला दिला. जाळीदार पारदर्शक असा हा पोशाख होता. या कपड्यांवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
 
हा पोशाख नेमका काय आहे आणि त्याला काय म्हणतात ते समजून घेऊया
 
बिश्ट काय आहे?
कतार टूर्नामेंट आयोजन समितीचे महासचिव हसन अल थवाडी यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितलं की, हा अधिकृत समारंभासाठी परिधान करावयाचा पोशाख आहे. मेस्सीच्या विजयातील योगदानासाठी त्याला हा पोशाख देण्यात आला.
 
त्यांनी पुढे सांगितलं, वर्ल्ड कप हा आमच्यासाठी अरब विश्व आणि मुस्लीम संस्कृतीला जगाला जोडणारा दुवा आहे. मेस्सीला देण्यात आलेला हा पोशाख फक्त कतारतर्फे नाही तर या भागात आयोजित महोत्सवाचं प्रतीक आहे.
 
मेस्सीला जो पोशाख देण्यात आला त्याला बिश्ट असंही म्हणतात. अरब देशांमधला हा एक सांस्कृतिक पोशाख आहे. खास प्रसंगीच हा पोशाख घातला जातो.
 
रविवारचा अर्जेंटिनाचा विजय मेस्सीच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. हे लक्षात घेऊनच त्याला हा पोशाख देण्यात आला. जाळीदार असा काळा-सोनेरी रंगाचा हा पोशाख आहे.
 
पण जेव्हा मेस्सीला हा पोशाख देण्यात आला आणि त्याने तो घातला तेव्हा त्याला तो कसा घालायचा हे कळलं नाही. शेख तमीम बिन हमद यांनी मेस्सीला तो पोशाख परिधान करण्यास मदत केली. यानंतर मेस्सी जेतेपदाच्या करंडकासह संघाच्या दिशेने गेला आणि आकाशात रोषणाईला सुरुवात झाली.
 
सोशल मीडियावर लोक काय म्हणत आहेत?
आयर्लंडचे ब्लॉगर जॉनी वार्ड यांनी लिहिलं की काळ्या पोशाखाने मेस्सीची अर्जेंटिनाची दहा क्रमांकाची लोकप्रिय जर्सी झाकोळली आहे.
 
जेतेपदाचा करंडक उंचावण्याचं मेस्सीचं स्वप्न होतं. शॉविक बॅनर्जी यांनी लिहिलं की काळे कपडे त्याच्या स्वप्नांमध्ये नक्कीच नसेल.
 
बलूमा नावाच्या युझरने लिहिलं की, काळ्या रंगाच्या पोशाखाने मेस्सीचा तो क्षण हिरावला गेला. बीडीएम नावाच्या युझरने लिहिलं की, काळ्या कपड्याविना अर्जेंटिनाच्या जर्सीत मेस्सीचा फोटो हवा आहे. आदी शाह यांनी लिहिलं की, एडिट करुन कोणी काळे कपडे हटवे शकतं का?
रॉब वेगनर नावाच्या ट्वीटर युझरने लिहिलं, कारकीर्दीतल्या सर्वोत्तम क्षणी मेस्सीला काळा कपडे घालण्याची सक्ती करण्यात आली. राजकीय नेत्यांना, प्रमुखांना खेळांच्या सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याला बोलावू नये.
 
काही लोकांनी मेस्सीला बिश्ट परिधान करायला दिलं यासाठी कौतुकही केलं आहे. मेस्सीला बिश्ट परिधान करायला लावलं म्हणून अनेक ट्वीट केली पण अर्जेंटिनाचा गोलकीपर एमी मार्टिनेझने आक्षेपार्ह हावभाव केले त्याबद्दल कोणीही लिहिलं नाही.
 
मोहम्मद मुतहिर अली नावाच्या युझरने लिहिलं की कतारने बिश्ट देऊन मेस्सीचा सन्मान केला. पण काही पाश्चिमात्य पत्रकारांनी कतारला कमी लेखण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून याचा मुद्दा केला.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत गाडगेबाबा पुण्यतिथी : गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार