Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विम्बल्डन : ऑगटचा निशिकोरीला तिसऱ्याच फेरीत धक्‍का

विम्बल्डन : ऑगटचा निशिकोरीला तिसऱ्याच फेरीत धक्‍का
लंडन , शनिवार, 8 जुलै 2017 (09:27 IST)
स्पेनच्या 18व्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगटने जपानच्या नवव्या मानांकित केई निशिकोरीवर 6-4, 7-6, 3-6, 6-3 अशी खळबळजनक मात करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. मात्र सातवा मानांकित मेरिन सिलिच व 16वा मानांकित जाईल्स म्युलर यांनी सरळ विजयासह चौथी फेरी गाठली. फ्रान्सच्या 21व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने अमेरिकेच्या बिगरमानांकित मॅडिसन ब्रेन्गलवर सरळ सेटमध्ये मात करताना महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. कॅरोलिनने मॅडिसनचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडून काढले. तसेच व्हिक्‍टोरिया आझारेन्काने हीथर वॉटसनची झुंज 3-6, 6-1, 6-4 अशी मोडून काढताना चौथी फेरी गाठली.
 
तृतीय मानांकित प्लिस्कोव्हाला रिबारिकोव्हाचा धक्‍का
त्याआधी तृतीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्‍का बसला. स्लोव्हाकियाच्या बिगरमानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाने दुसऱ्या फेरीच्या लढतीत प्लिस्कोव्हाचे आव्हान 3-6, 7-5, 6-2 असे कडव्या झुंजीनंतर संपुष्टात आणले. तसेच ऍलिसन रिस्केने 12व्या मानांकित क्रिस्टिना लाडेनोविचचा 2-6, 6-4, 6-4 असा पराभव करताना आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद केली.
 
मात्र त्याच वेळी अग्रमानांकित अँजेलिक कर्बर, पाचवी मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकी, सातवी मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हा, नववी मानांकित ऍग्नेस्का रॅडवान्स्का, चौदावी मानांकित गार्बिन मुगुरुझा आणि 19वी मानांकित तिमिया बॅकिन्स्की या मानांकितांनी मात्र आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमविताना तिसरी फेरी गाठली.
सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांच्या अनुपस्थितीत विजेतेपदासाठी सर्वोत्तम संधी असलेल्या अग्रमानांकित कर्बरने कर्स्टन फ्लिपकिन्सचा प्रतिकार 7-5, 7-5 असा संपुष्टात आणताना तिसरी फेरी गाठली. वोझ्नियाकीने स्वेतना पिरोन्कोव्हाला 6-3, 6-4 असे सहज पराभूत केले. कुझ्नेत्सोव्हाने एकेटेरिना माकारोव्हाचा 6-0, 7-5 असा धुव्वा उडविला.
 
रॅडवान्स्काने ख्रिस्टिना मॅकहेलची कडवी झुंज 5-7, 7-6, 6-3 अशी मोडून काढताना आगेकूच केली. तर मुगुरुझाने यानिना विकमायरचा 6-2, 6-4 असा फडशा पाडला, तर तिमिया बॅकिन्स्कीने क्रिस्टिना कुकोव्हाचा 6-1, 6-0 असा पराभव करताना तिला टेनिसचे धडे दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अॅम्बेसी अॉफीस पार्कची क्ले स्कूल्स बरोबर भागीदारी