'
आ देखे जरा' हा चित्रपट नील नितिन मुकेशची कसोटी पाहणारा ठरेल. नीलने यापूर्वी जॉनी गद्दारमध्ये काम केले होते. त्यातील अभिनयाबद्दल त्याचे कौतुकही झाले होते. त्याच्या जोरावरच त्याला हाही चित्रपट मिळाला. पण हा चित्रपट कसा चालतो, त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. शेवटी कुठल्याही अभिनेत्याचे वा अभिनेत्रीचे खरे मुल्यमापन बॉक्स ऑफिसवरच होत असते. रणबीर कपूर, इमरान खान व नील नितिन मुकेश या तिघांकडून काही अपेक्षा बाळगता येतील. पुढच्या काळातील सुपरस्टार यांच्यापैकीच कुणी एक असू शकेल. पण अर्थात, हा लांबचा पल्ला आहे. नीलचे आजोबा नितिन हे हिंदी चित्रसृष्टीतील 'लीजंड' ठरू शकतील, अशा गायकांपैकी एक होते. त्यांचे वडिलही चांगले गायक आहेत. पण वडिलांच्या प्रभावातून ते बाहेर पडू शकले नाहीत. नीलने आपल्या वडिलांचे जे झाले ते पाहता, गायक बनण्याऐवजी अभिनयाचा मार्ग स्वीकारला. एरवी नायक म्हणून पडद्यावर येताना कोणताही नवोदित अभिनेता प्रेमकथेला पसंती देतो. नीलने मात्र जॉनी गद्दारच्या रूपाने थ्रिलर चित्रपट स्वीकारला. शिवाय यात त्याची भूमिकाही निगेटिव्ह शेडची होती. यात तो आपल्या मित्राच्या पत्नीशी प्रेमाचे खेळ खेळतो शिवाय आपल्या एकेक मित्राची हत्याही करत जातो. हा चित्रपट पडला, पण नीलच्या अभिनयाचे कौतुक झाले.
रिमी सेन या चित्रपटात नीलची नायिका होती. त्याच्यपेक्षा ती वयाने जास्त दिसत होती. आता नीलचा 'आ देखे जरा' हा दुसरा चित्रपट येतोय. हाही थ्रिलरपट आहे. यात त्याची नायिका बिपाशा बसू आहे. जी वयाने त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण तरीही हा चित्रपट यशस्वी होईल, असा त्याला विश्वास आहे.
नीलने या चित्रपटासाठी बरचे काही केले. सिक्स पॅक्स एब बनविले. तायक्वांडो शिकला. इतकंच नाही तर नवव्या मजल्यावरून खाली उडीही मारली. आता नीलच्या हातात 'जेल', न्यूयॉर्क, तेरा क्या होगा जॉनी हे चित्रपट आहेत. मधुर भांडारकर, सुधीर मिश्रा व यशराज फिल्म्स सारखे बडे बॅनर त्याच्या मागे आहेत.