आपल्या अजरामर गाण्यांनी एक काळ गाजविणारे ज्येष्ठ गायक मन्ना डे यांना मराठी उच्चार जमत नाहीत म्हणून संगीतकार शंकरराव व्यास यांची बोलणी खावी लागली होती. शंकररावांनी शिकविले म्हणूनच आपण आत्मविश्वासाने मराठी गाणी गाऊ शकलो, असे मन्ना नम्रपणे सांगतात. ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्च्न यांच्या मधुशाला या काव्याला मी आवाज दिला, पण त्यांच्या निधनानंतर सुपरस्टार अमिताभ बच्च्नने याची साधी दखलही घेतली नाही, अशी खंतही ते व्यक्त करतात. ८८ वर्षांचे मन्ना डे म्हणजे बॉलीवूडचा चालता बोलता इतिहासच.
'ए मेरी जोहर जबीं, कौन आया मेरे मनके द्वार, लागा चुनरी मे दाग' या सारखी त्यांची गाणी अजरामर आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो 'ए भाय जरा देखके चलो ' या ' मेरा नाम जोकर' या चित्रपटातील उडत्या चालीच्या गीताला. जालना येथे गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी मन्ना डे यांनी आपल्या कारकिर्दीतील सोनेरी क्षण पत्रकारांसोबत शेअर केले. मन्ना शरीरांने वृद्ध झाले तरी अजूनही तरूणांना लाजवतील एवढे तरतरीत आहेत. गायलेली गीते आजही त्यांच्या ओठांवर आहेत.
देशातील सर्व भाषांमध्ये त्यांनी गीतगायन केले आहे, हे सांगताना एका मल्याळम गीताच्या ओळीही त्यांनी म्हणून दाखविल्या. मराठीत त्यांनी रामराज्य या चित्रपटासाठी गायन केले होते. त्यातील 'पाकळी पाकळी तुवा राघवा, पायदळी तुडविली' या गीताच्या ओळी गुणगुणल्या. हे गीत संगीतबद्ध करताना संगीतकार शंकरराव व्यास यांनी आपणास 'ळ' हा शब्द उच्चारता येत नसल्याबद्दल अनेक वेळा दटावल्याची आठवण त्यांनी यावेळी हसत हसत सांगितली.
आपल्या संघर्षाला उजाळा देताना मन्ना म्हणाले, शास्त्रीय संगीत शिकलो तरी शास्त्रीय गायक होण्याची इच्छा कधीच नव्हती. पार्श्वगायक म्हणूनच करीयर करायचे होते. काका व ख्यातनाम संगीतकार के. सी. डे यांचे बोट धरून मुंबईत आलो. १९४८ साली 'भगवान की देन' या चित्रपटात पहिल्यांदा गाणे गायिले. सतत ६० वर्षे आपण केवळ चांगलेच गाणे गायले. शोले चित्रपटातील मेहबूबा, मेहबूबा हे पंचमदाने गायलेले गीत आपण केवळ आवाज खराब होईल म्हणून नाकारले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. चित्रपट अभिनेत्यांमध्ये राजकपूर हे खूप मोठे व्यक्तीमत्व होते, त्यांना संगीताचा कान होता. त्यांच्यासारखा कलाकार नंतर पाहण्यात नाही, असेही ते म्हणाले.
हरिवंशराय बच्च्न यांचे 'मधुशाला' हे महाकाव्य आपण गायले. मात्र, ते गेल्यानंतर त्यांचे पुत्र अमिताभ बच्च्न यांनी आपली साधी दखलही घेतली नाही, याबद्दल मन्नांनी खंत व्यक्त केली. आजचे संगीत म्हणजे धांगडधिंगा आहे. त्याचे सादरीकरणही अत्यंत वाईट पद्धतीने केले जाते अशा शब्दात मन्ना डे यांनी नवीन संगीतावर टीका केली. सोनू निगम, श्रेया घोषाल यांना चांगले भवितव्य आहे, असेही ते म्हणाले.