एन चंद्रा
सामाजिक अस्वस्थतेस कलात्मक अभिव्यक्ती देणारा दिग्दर्शक
जन्म- ४ एप्रिल 19५२
एन. चंद्रा ऊर्फ चंद्रकांत नार्वेकर या मराठी माणसाने आज हि्दी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांनी सामाजिक अस्वस्थतेला आपल्या चित्रपटातून अभिव्यक्त केले. शिवाय या अभिव्यक्तीला कलात्मक दर्जाही दिला. त्यामुळे त्यांचे सुरवातीचे प्रतिघात, अंकुश, तेजाब हे चित्रपट आजही अपील होतात.
एन चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय निरीक्षण सूक्ष्म असून ते परिणामकारकरित्या कथा, पटकथेत गुंफतात.
वर्तमानकालिन सामाजिक परिस्थितीचा योग्य वापर करून त्याचा कुशल उपयोग चंद्रांनी चित्रपटात केला. त्यामुळे प्रतिघातमध्ये गुंडांच्या अत्याचाराखाली चिरडल्या गेलेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी चार तरूणांनी कायदा हातात घेऊन शोधलेला उपायाची कथा आहे.
आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कायदा हातात घेण्याचा मार्ग योग्य नव्हे, पण ती लोकांची तात्कलिक प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रियेला वाट करून देण्याचा प्रयत्न चंद्रांनी आपल्या चित्रपटातून केला. त्यामुळेच प्रतिघात, अंकुश, तेजाब यशस्वी ठरले. थोड्याफार फरकाने या चित्रपटांचा आशय सारखाच आहे.
'तेजाब' मधून त्यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली. यातील गाणी व माधुरी दीक्षित दोन्ही गाजले. अनिल कपूरची हिरो म्हणून प्रतिमा गडद झाली.
'वजूद' चित्रपटातून एक चांगली कलाकृती निर्माण होण्याची शक्यता होती. पण कथा कुठेतरी फसला आणि चांगला चित्रपट होता होता राहिला. यातील नाना पाटेकर व माधुरी दीक्षितचा अभिनय लाजवाब. चंद्रांच्या चित्रपटाचे वातावरण अतिशय़ छान असते. पटकथेला साजेसे सेटस असतात.
प्रतिघातपासून वजूदपर्यंतचा हा ट्रेंड आहे. त्यामुळे सेट उभारून वास्तवापासून दूर जाणारा चित्रपट असे त्यांच्याबाबतीत घडत नाही.
संवेदशील विषयांची हाताळणी करणाऱ्या चंद्रांनी आता मात्र, काळाच्या बरोबरीने चालण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे नव्या बदललेल्या पिढीला भावणारे चित्रपट काढण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळेच मध्ये काही चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्यांचे 'स्टाईल, एक्सक्यूज मी हे चित्रपट यशस्वी ठरले. आता त्यांनी हाती घेतलेला 'ब्रेकींग न्यूज' लवकरच पूर्ण होईल.
एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट-
प्रतिघात, अंकुश, तेजाब, नरसिंहा, तेजस्विनी, युगांधर, हमला, बेकाबू, वजूद, स्टाईल, एक्सक्यूज मी, शिकारी, कगार-लाईफ ऑन द एज