फॅशन या चित्रपटात प्रियंका चोप्राने एका छोट्या गावातून येऊन सुपरमॉडेल बनण्यापर्यंतचा प्रवास दाखविला होता. प्रियंकाचा वास्तविक आयुष्यातील प्रवासही असाच आहे. बरेलीसारख्या छोट्या शहरातून ती मुंबईत आली. फॅशनला वास्तववादी बनविण्यात तिचा प्रवास महत्त्वाचा ठरला. प्रियंका ग्लॅमरस आहेच, पण राष्ट्रीय पुरस्काराने तिच्यातल्या अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब केले आहे. रेखा वगळता कोणत्याही ग्लॅमरस अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळालेला नाही.
रविवारी या पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी प्रियंका न्यूयॉर्कमध्ये शुटींग संपवून हॉटेलमध्ये झोपलेली होती. त्यानंतर तिच्या मोबाईलची रिंग थांबता थांबत नव्हती. फोन घेत नसल्याने तिचा मेसेज बॉक्स भरभरून वहात होता. पुरस्कारावर बोलताना तिने दिलेली प्रतिक्रियाही प्रांजळ होती. ती म्हणाली होती, की या पुरस्काराने मी अतिशय आनंदीत झाले आहे. हा पुरस्कार मिळाला आहे, यावर विश्वासच बसत नाहीये. जणू स्वप्नात असल्यासारखे वाटते आहे. या पुरस्कारासाठी मी मधूर सर आणि रॉनी यांची आभारी आहे. त्याचबरोबर कंगना, मुग्धा व फॅशनशी निगडीत प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे. कंगनालाही पुरस्कार मिळाला, त्याचाही मला आनंद आहे. कारण कंगनाच्या 'शोनाली'शिवाय 'मेघना'चे जीवन अपूर्ण आहे.'
हिंदी चित्रपट जगतात २००३ मध्ये सहनायिका म्हणून पाऊल ठेवणारी प्रियंका आज शिखरावर आहे. फॅशन चित्रपटाची कथा आणि प्रियंकाचे वैयक्तिक आयुष्य परस्परांशी मेळ खाणारे आहे. प्रियंकाचा जन्म जमशेदपूरमध्ये झाला. शालेय शिक्षण बरेलीत झाले. तिचे वडिल दीपक चोप्रा लष्करात होते. त्यांनी मुलीला शिक्षणासाठी परदेशात पाठवले. पण नंतर त्यांनी तिला बरेलीतच बोलावले. बरेलीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियंकाने मुंबईतील जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिला सायकॅट्रिस्ट व्हायचे होते. पण नियतीने तिला सौंदर्य स्पर्धेत नेले आणि तिथून ती बॉलीवूडच्या वाटेला लागली. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत दुसरी आल्यानंतर फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकूट घेऊन मिस वर्ल्ड स्पर्धेत गेली आणि ही स्पर्धा जिंकूनच परतली. गेल्या वर्षी या स्पर्धेची ती जजही होती. एक वर्तुळ या निमित्ताने पूर्ण झाले.
प्रियांकाशी 'अंदाज'पासून ते अगदी कालच्या 'कमीने'पर्यंत अनेकदा बोलण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळी तिचे एक नवे रूप दिसले. 'अंदाज'च्या वेळी लारा व अक्षय कुमार समोर बुजलेली प्रियंका 'प्लॅन'च्या वेळी मात्र संजय दत्तची नायिका बनल्यानंतर चांगलीच खुलली होती. आपल्या करीयरच्या यशस्वीतेबद्दल बोलताना एकदा ती म्हणाली होती, 'मी नशीबवान आहे. फक्त १७ वर्षांची होती तेव्हा मिस इंडिया बनली. चित्रपट जगतात येऊन पाच ते सहा वर्षे झाली, ती पाहून मी बरेच काम केले असे वाटते. अभिनयाचे रितसर प्रशिक्षण घेतलेले नाही. माझा कुणी गॉडफादर नाही. चित्रपट जगताशी संबंधित माझा कुणीही नातेवाईक नाही. तरीही नशिबाने यश माझ्या पदरात पडले आहे. चित्रपट आवडतात म्हणून मी या क्षेत्रात आहे.'
IFM
IFM
प्रियंकाने सुरवातीपासूनच चांगल्या बॅनरच्या आणि चांगल्या कलावंतांच्या साथीने चित्रपट केले. अक्षय कुमारबरोबर तिची जोडी जमली. मग त्यांच्या कथित प्रेमाची चर्चा व्हायला लागल्यानंतर अक्षयने प्रियंकाशी असलेले संबंध तोडले. वास्तविकतः प्रियंकाचे हरमन बावेजाशी आधीपासूनच प्रेमसंबंध होते. करमच्या सेटवर दोघांमध्ये असलेले संबंध जाणवत होते. त्याच्यासोबत तिने लव्हस्टोरी २०५० हा चित्रपटही केला. पण तो अपयशी ठरला. त्यानंतर प्रियंकाने 'डॉन' व 'द्रोण' हेही चित्रपट केले. पण ते अपयशी ठरले. अर्थात तिच्या करीयरवर मात्र याचा परिणाम झालेला दिसला नाही. उलट यशस्वी बॅनर असलेल्या यशराजमध्ये तिचा समावेश याच काळात झाला. 'अंदाज'च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये आलेल्या प्रियंकाला नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर 'ऐतराज'च्या निमित्ताने तिला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर फॅशनसाठी तिला फिल्मफेअरने गौरविण्यात आले.
फॅशनसाठी तिने खूपच कष्ट घेतले होते. दारू पिणे आणि सिगरेट ओढणे या बाबीही ती भूमिकेला आवश्यक म्हणून शिकली. 'भूमिकेत स्वतःला झोकून देणे मला आवडते. म्हणून मी सिगरेट प्यायलाही शिकले. पहिल्यांदा सिगारेटचा कश घेतला तेव्हा जोरदार ठसका लागला. पण त्याचवेळी या भूमिकेचे कौतुक झाले तेव्हा बरेही वाटले,' असे प्रियंका सांगते. आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने तिच्या यशावर खर्या अर्थाने राजमुद्रा उमटली आहे.
'मेनस्ट्रिम'ध्ये फक्त रेखाला राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कारांवर आतापर्यंत कलात्मक चित्रपटात काम करणार्या अभिनेत्रींचेच वर्चस्व राहिले आहे. शबाना आझमी, स्मिता पाटील या अभिनेत्री मुख्य प्रवाहातही होत्या, पण कलात्मक चित्रपटांच्या नायिका हीच त्यांची खरी ओळख राहिली. शबाना आझमींना पार, कंधार, अर्थ व अंकुरसाठी हा पुरस्कार मिळाल. रेखाला उमराव जानसाठी गौरविण्यात आले. कमी काळात हा पुरस्कार मिळविणार्यांमध्ये तब्बू व कोंकणा सेन यांचा समावेश आहे. तब्बूला माचिस व चांदनी बारसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. कोंकणा सेनला मि अँड मिसेस अय्यरसाठी गौरविण्यात आले. आता हा पुरस्कार मिळविणारी प्रियंका हीच मुख्य प्रवाहातली ग्लॅमर असलेली नायिका आहे.