जाने कहॉं गये वो दिन (राज कपूर जयंतीविशेष)
बॉलीवूडमधील शोमॅन राज कपूर यांची आज ८३ वी जयंती. चित्रपट हाच श्वास असलेला हा चित्रकर्मी आज जिवंत असता तरी आपला नातू रणबीर कपूरला लॉंच करण्यसाठी चित्रपट तयार करत असता. राज कपूर जाऊन १९ वर्षे झाली, पण जाने कहॉं गये वो दिन कहते थे तेरी याद में अशीच मनाची भावावस्था आहे.राज कपूरचे चित्रपट आजच्या सारखे चमकत्या दुनियेचे प्रतिनिधीत्व करणारे नव्हते. मनोरंजनाआड काही तरी संदेश त्यातून दिला जात असे. आधी हकीकत आधा फसाना अशी त्यांची शैली होती. सामान्य माणासाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगितले. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवात दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज कपूर यांच्याविषयी सर्वांनाच माहिती आहे. पण इथे त्यांच्याविषयीचे काही वेगळे पैलू दाखविण्याचा प्रयत्न आहे.राजला आणखी दोन भाऊ होते राज कपूर यांची बहिण उर्णिला, भाऊ शम्मी व शशी यांच्याशिवाय त्यांना रवींद्र व देवेंद्र नावाचे दोन भाऊ होते. पण त्यांचा लहान वयातच मृत्यू झाला होता. रवींद्रने चुकून उंदरांना मारण्याचे विष प्यायले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर त्यानंतर आठवड्याच्या आत देवेंद्रही न्युमोनियामुळे मृत्युमुखी पडला. त्यानंतर शम्मी व शशी कपूर यांचा जन्म झाला. राज कपूर यांना शम्मी फार आवडायचा. शम्मीला नायक म्हणून त्यांच्या चित्रपटात घ्यायची त्यांची खूप इच्छा होती. पण शम्मीची याहू इमेज राज यांच्या चित्रपटातील भूमिकांशी जुळत नव्हती. पण शेवटच्या काळात प्रेमरोगमध्ये अखेर शम्मीने काम केले.आर. के. चा लोगोआर. के. बॅनरच्या लोगोत एक माणूस एका हाताने व्हायोलिन वाजवतोय व दुसऱ्या हातात एक स्त्री झुलते आहे, असे दाखविले आहे. हा लोगो बरसात या चित्रपटातील एका प्रसंगातून घेतला आहे. या प्रसंगावर आधारीत चित्र होते. ते राज यांना खूप आवडले. कारण एका हातात संगीत व दुसऱ्या हातात सौंदर्य होते. राज या दोन्हीचे भोक्ते होते. म्हणूनच त्यांनी या चित्राला आपल्या बॅनरचा लोगो बनविले.राज कपूरचा नायक- सामान्य माणूस
राज यांच्या चित्रपटांतील नायक हा सामान्य माणूस आहे. फुटपाथवर रहाणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळतात. हे काही गरीबीचे उदात्तीकरण वा स्वतः ऐषोआरामात राहून गरीबी पहायची यातून आले नव्हते. वास्तविक राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेलऐवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर किंवा ढाब्यावर जायचे. त्यामुळे खरीखुरी मंडळी त्यांना भेटायची.त्यांची सुख दुःख त्यांना समजायची. त्यांच्या चित्रपटाचा हा प्रेरणास्त्रोत होता. ते म्हणायचे देखिल, मी सामान्यांसाठी चित्रपट तयार करतो. त्यामुळे त्यांच्यात वेळ घालविणे मला आवडते.सत्यजित राय यांचा प्रभाव
राज चोरी चोरीचे शूटींग तत्कालीन मद्रासमध्ये करत होते, त्यावेळची गोष्ट. सत्यजीत राय दिग्दर्शित पथेर पांचाली या चित्रपटासंदर्भात त्यांनी ऐकले होते. त्यावेळी मद्रासमध्ये हा चित्रपट दाखवला जात होता. राज यांनी चित्रपट पाहिला आणि दोन दिवस ते त्या प्रभावातून बाहेर येऊ शकले नाहीत. नंतर ते सत्यजीत राय यांना भेटलेसुद्धा. त्यांना आर. के. बॅनरसाठी चित्रपट बनवायला सांगितले. पण राय यांना हिंदी येत नव्हती. त्यामुळे हे शक्य झाले नाही.
कानाखाली आवाज काढल्यानंतर.....
पृथ्वीराज कपूर यांचा समृद्ध वारसा राज यांना लाभला होता. त्यांनी सुरवातीपासूनच अभिनयापेक्षा चित्रपटाच्या इतर तांत्रिक अंगात रूची दर्शवली होती. म्हणून पृथ्वीराज यांनी त्यांना यासंदर्भात मार्गदर्शनासाठी केदार शर्मा यांच्याकडे पाठविले. पृथ्वीराज हे स्वतः राज यांच्यासाठी चित्रपट तयार करू शकत होते, पण मुलाने या व्यवसायाची सुरवात अगदी अबकडईपासून करावी अशी त्यांची इच्छा होती. केदार शर्मा यांच्या चित्रपटात राज यांना क्लॅपर बॉयचे ( शॉटसाठी फटमार करणारी मुले) काम मिळाले.
शॉट सुरू होण्यापूर्वी राज केसात कंगवा फिरवून क्लॅप देत असत. केदार यांनी त्यांना अनेकदा सांगितले, की त्यांना चित्रपटात दाखवयाचे नाहीये. त्यामुळे उगाचच केस विंचरण्याची गरज नाही. पण राज त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असे.
एकदा त्यांनी क्लॅपर पट्टी एकमेकांवर एवढ्या जोरात आदळली की त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका अभिनेत्याची नकली दाढी त्यात अडकून ती खाली पडली. हे पाहून केदार शर्मा भडकले. त्यांनी एक सणसणीत थप्पड राजच्या गालावर ठेवून दिली. पुढे याच केदार शर्मा यांनी राज यांना नीलकमल या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. यासंदर्भात पुढे केदार शर्मांनी म्हणून ठेवलंय, राजच्या डोळ्यांत त्या दिवशी जे दुःख अगदी खोलवर दिसत होते. त्यामुळे मी आतून हललो. प्रभावित झालो. थोडक्यात एका थप्पडीने राज यांच्या चित्रकारकिर्दीचा प्रवास सुरू झाला.