Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तार्‍यां'च्या जगातला अ(न)मोल 'तारा'

'तार्‍यां'च्या जगातला अ(न)मोल 'तारा'
ND
अमोल गुप्ते हे नाव आज 'तारे जमीं पर' या चित्रपटाचा लेखक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सगळीकडे पोहोचले आहे. पण अमोल गुप्ते म्हणजे तेवढेच असे मानणे मात्र चुकीचे ठरेल. अमोल बहुआयामी प्रतिभेचा धनी आहे. खुल्या विचारांचा, स्वप्न विणणारा आणि मनसोक्त रंग उधळणारा असा हा माणूस आहे.

बालपणीच अमोलला पेंटिंग करण्याचा छंद होता. अगदी तारे जमींवर मधील इशान अवस्थीसारखाच. त्याने चित्रकला स्पर्धेत अनेक बक्षीसं मिळवली. शालेय जीवनातही तो खोडकर होता. ईशानसारखीच शाळेला दांडी मारण्याचे उद्योग त्यानेही केले होते. शाळेतून आलेल्या नोटीशीवर माझी आई अडाणी आहे, हे कारण देऊन शेजारच्यांची स्वाक्षरीही घेतली होती. पण असे असले तरी अभ्यासातही तो तितकाच हुशार होता. शाळेत त्याने पहिला नंबर कधीच सोडला नाही. कॉलेजमध्ये पोहचल्यावर मात्र तो मागे पडला. कारण तोपर्यंत त्याला थिएटरचा लळा लागला होता. 1981 मध्ये त्याला एफटीआयआयचा 'चक्कर चंदू का चमेली वाला' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. एफटीआयआयचा विद्यार्थी नसतानाही तो तासनतास तिथेच वेळ घालवू लागला. त्यामुळे आई-वडिलही त्याच्यावर नाराज असत.

पण असे असले तरी एक चित्रकार म्हणून त्याने चांगलीच ख्याती मिळवली होती. 1995 मध्ये संजना कपूरने आपल्या पृथ्वी आर्ट गॅलरीत त्याच्या सोलो चित्रांचे प्रदर्शन भरविले. पुढे 1998 मध्ये आणखी एक प्रदर्शन भरविण्यात आले. मधल्या काळात त्याने टिव्ही उद्योगात लेखक आणि तंत्रज्ञ म्हणून पाय रोवले होते. कुंदन शहा आणि सईद मिर्झा या नामवंत दिग्दर्शकांचा सहायक म्हणून त्याने काम केले होते. भारतीय टीव्हीवरील सगळ्यात मोठा टॉक शो असलेल्या 'बिंदास बोल' चे संचलन देखील केले होते.

हे करत असताना त्याच्या आतील संवेदनशील अमोलही जागा होता. मुलांविषयी त्याला लहानपणापासूनच कळवळा. मुलांबद्दलची आतली ओल त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या प्रतिभेला मुक्त व्यासपीठ सध्या मिळत नाही, त्यांचे लहानपण, त्यांची प्रतिभा चुरगळते आहे, हे त्याला दिसत होते. म्हणून त्याने त्यांच्यासाठी काही करण्याचा निर्णय घेतला. मग तो मुलांसाठी कला कार्यशाळा भरवू लागला. नाटकांच्या माध्यमातून मुलांच्या अभिनयाला वाव देऊ लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे म्हणतात. अमोलच्या बाबतीतही ही भूमिका त्याची पत्नी दीपा भाटियाने पार पाडली. तिने अमोलला कुठेही रोखले नाही, उलट त्याची पाठराखणच केली.

webdunia
ND
सृजनात्मकतेला लगाम घालून मुलांचे बालपण संपविणार्‍या शिक्षण प्रणालीच्या विरोधात या दाम्पत्याने एक प्रकारे गांधीगिरीच सुरू केली. मागील एका दशकापासून त्यांनी आपल्याला लहान मुलांसाठी वाहून घेतले आहे. शारीरिक आणि मानसिक अपंग असणार्‍या मुलांच्या शाळेत अमोल आपली कार्यशाळा घेतो. त्याच्या 'शाळेत' मुले गातात, चित्र काढतात. आणि विशेष म्हणजे दंगा मस्तीही करतात. या मुलांसाठी तो 'सर' नाही तर आपले सुख-दु:ख वाटणारा त्यांचा मित्रच आहे. म्हणूनच मुले अमोलच्या गळ्यात गळा घालतात. त्याची दाढी ओढतात. काय वाट्टेल ते करतात. अमोल स्पष्ट सांगतो, ''तो या मुलांचा शिक्षक नाही, मित्र आहे.'' मुलांबद्दल असलेल्या या जिव्हाळ्यानेच त्याच्याकडून 'तारे जमीं पर' सारखी संवेदनशील चित्रकृती तयार झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi