'बॉलीवूड'ची आख्खी इंडस्ट्री दादासाहेब फाळके या धडपड्या मराठी माणसाच्या अथक प्रयत्नांतून जन्माला आली असली तरीही पुढच्या
ND
ND
काळात या बॉलीवूडवर मराठी ठसा फारच अभावाने उमटला. सांगितिक क्षेत्रात लता-आशा ही अक्षय्य नावे होतीच, पण निर्माता, दिग्दर्शक म्हणून फारच अभावाने मराठी नावे दिसत. शांताराम वणकुद्रे अर्थात, व्ही. शांताराम हे नाव मात्र याला सणसणीत अपवाद ठरावे. शांताराम यांनी केवळ मराठी मुद्रा बॉलीवूडवर उमटवली असे नाही, तर या कचकड्याच्या या नगरीला काही मुल्ये आणि नैतिकताही शिकवली. हे फक्त रंजनाचे साधन नाही, तर प्रबोधनाचेही आहे आणि रंजन करता करता तेही प्रबोधनही करता येते हे त्यांनी दाखवून दिले.
नीतीमत्ता आणि मुल्ये हरवलेल्या जगात याच मुल्यांची शिकवण चित्रमाध्यमातून देणारे शांताराम द्रष्टा दिग्दर्शक, निर्माते होते. डॉ. कोटणीस की अमर कहानी (१९४६), अमर भूपाळी (१९५१), झनक झनक पायल बाजे (१९५५), दो आँखे बारह हाथ (१९५७) आणि नवरंग (१९५९) आणि पिंजरा (१९७३) याशिवाय माणूस, शेजारी या अविस्मरणीय चित्रपटांसाठी शांताराम यांचे नाव चिरस्मरणीय राहिल.
गीत, संगीत हा शांताराम यांच्या चित्रपटाचा अतिशय महत्त्वाचा भाग असायचा. म्हणूनच त्यांच्या सर्वच चित्रपटांची गाणी बेफाम गाजली. त्यातली नृत्येही लक्षात राहिली. नृत्यावरच्या त्यांच्या प्रेमामुळेच त्यांनी झनक झनक पायल बाजेसारखा नृत्यप्रधान चित्रपट केला. नवरंगमधील संध्याचे नृत्यही त्यांच्या या प्रेमातूनच आले.
केवळ नृत्य आणि संगीतच नव्हे तर चित्रपटाच्या तांत्रिक अंगाविषयीही जागरूक असणारा त्यांच्याइतका दिग्दर्शक विरळाच. माणूसमध्ये त्यांनी केवळ रात्र आणि सावल्या यांच्या वापरातून कथा अशी काही फुलवलीय की ज्याचे नाव ते. त्यांच्या नावावरचे काही 'विक्रम' पाहिले तरीही हा माणूस किती मोठा होता ते कळते. राणीसाहेबा (१९३०० हा पहिला बालचित्रपट काढण्याचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. चंद्रसेनाच्या (१९३१) निमित्ताने बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा ट्रॉलीचा उपयोग त्यांनी केला. सैरंध्री (१९३३) हा पहिला रंगीत चित्रपटही त्यांच्याच नावावर आहे. टेलीफोटो लेन्सचा वापर त्यांनीच पहिल्यांदा अमृतमंथन (१९३४) या चित्रपटात केला. जंबुकाका (१९३५) या चित्रपटात प्रथम त्यांनीच एनिमेशनचा वापर केला. अमर ज्योती (१९३६) या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच प्रोजेक्शनचा वापर झाला. परदेशात भारतीय चित्रपट दाखविण्याच्या परंपरेचा मानही शांतारामांकडे जातो. त्यांचे डॉ. कोटणीस की अमर कहानी आणि शकुंतला हे परदेशात दाखविलेले गेलेले पहिले भारतीय चित्रपट आहेत.
बॉलीवूडमध्ये इतके ललामभूत काम करणार्या शांतारामांचा चित्रपटप्रवास मात्र इतका सहज झाला नाही. चित्रपटाविषयीचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतले नव्हते. वयाच्या बाराव्या वर्षी ते रेल्वेमध्ये शिकाऊ कामगार होते. पुढे बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळीत ते पडदे ओढण्याचे काम करू लागले. त्यानंतर बाबूराव पेंटर यांच्या संपर्कात ते आले नि त्यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम करू लागले. चित्रपटाची भाषा त्यांना बाबूरावांनी शिकवली. त्यावेळी सावकारी पाश (१९२५) या चित्रपटाची निर्मिती सुरू होती, त्यातून शांतारामांना चित्रभाषा समजली.
त्यानंतर दोनच वर्षांनी शांतारामांनी स्वतःच चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरविले. नेताजी पालकर हा त्यांचा पहिला सिनेमा. पुढे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक म्हणाव्या अशा प्रभात फिल्म कंपनीची स्थापन त्यांनी व्ही. जी. दामले, के. आर. धायबर, एस. फत्तेलाल, एस. बी. कुलकर्णी यांच्या साथीने केली. आयोध्येचा राजा हा पहिला चित्रपट. भारत उपलब्ध असलेल्या जुन्या चित्रपटांपैकी हा सर्वांत जुना चित्रपट आहे. सुरवातीला शांताराम आपले गुरू बाबूराव पेंटर यांच्या मार्गावरून चालत फक्त धार्मिक चित्रपटच काढत होते. पण एकदा ते जर्मनीला गेले पाश्चात्य जगतातील चित्रपटांचे समृद्ध कथाविषय पाहून ते हरखून गेले. त्यानंतरच मग अमृतमंथन हा चित्रपट काढला. बुद्धाच्या कथेवर आधारीत हा चित्रपट त्यावेळी फार वेगळा होता. सिल्वर ज्युबली करणारा हा पहिला बॉलीवूडचा चित्रपट आहे. पुढे प्रभातच्याच बॅनरखाली त्यांनी तीन अविस्मरणीय चित्रपट दिले. कुंकू (हिंदीत- दुनिया न माने)- १९३७, माणूस (आदमी)-१९३९ आणि शेजारी (पडोसी)-१९४१)
पण या चित्रपटत्रयीनंतर शांतारामांनी प्रभात कंपनी सोडली आणि स्वतःचा राजकमल स्टुडीओ स्थापन केला. ही घटना १९४२ ची. राजकमल स्टुडीओच्या माध्यमातून त्यांनी पहिला चित्रपट काढला तो शकुंतला. त्यावेळी म्हणजे १९४७ मध्ये तो कॅनडातील चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता. त्यानंतर आला डॉ. कोटणीस की अमर कहानी. चीनमध्ये गेलेल्या डॉ. कोटणीस यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपटही वाखाणला गेला. अमर भूपाळी हा गाजलेला मराठी चित्रपटही याच रांगेतला. त्यांच्या नृत्यप्रेमातूनच त्यांनी झनक झनक पायल बाजे काढला. त्यासाठी प्रसिद्ध नर्तक गोपीकृष्णांकडून अभिनय करवून घेतला.
१९५७ मध्ये मग मेलोड्रामिक चित्रपटानंतर ते पुन्हा सामाजिक चित्रपटांच्या आपल्या आवडत्या विषयांकडे वळाले. 'दो ऑंखे बारह हाथ' याच काळातला. एका कठोर तुरूंगाधिकार्याने कैद्यांचे मनपरिवर्तन कसे केले हा या चित्रपटाचा विषय. शांतारामांनी तो अतिशय प्रभावीपणे मांडला. या चित्रपटाने राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकावले. शिवाय बर्लिन चित्रपट महोत्सवात सिल्व्हर मेडल, तर उत्कृष्ट परकीय चित्रपटासाठीचे सॅम्युअल गोल्डविन अवार्डही पटकावले.
PR
PR
पण या चित्रपटानंतर काढलेल्या त्यांच्या नवरंगवरून समीक्षकांनी त्यांच्यावर खूप टीका केली. उथळ नि भडक असे त्यांनी या चित्रपटाचे वर्णन केले. पण तरीही लोकांना मात्र हा चित्रपट खूप आवडला. नवरंगनंतर अविस्मरणीय असा चित्रपट त्यांनी मराठी चित्रसृष्टीला दिला तो म्हणजे पिंजरा. जोसेफव्हॉन स्टर्नबर्गच्या द ब्ल्यू अँगल या चित्रपटावरून पिंजरा तयार केला आहे. पण तो कुठेही परकीय कल्पनेवरून उचललेला आहे असे वाटत नाही. श्रीराम लागूंच्या अभिनयाची वेगळी उंची दाखविणारा आणि राम कदमांच्या संगीताची अवीट गोडी असेलला हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. यानंतर जवळपास चित्रसंन्यास घेतलेल्या शांतारामांना 'झांझर' हा चित्रपट १९८६ मध्ये गेला. पण त्यांचा जुना शांतारम टच मात्र यावेळी हरवला होता. कदाचित काळही बदलला असावा. त्यामुळे तो चालला नाही.
अखेर ३० ऑक्टोबर १९९० रोजी हा द्रष्टा माणूस काळाच्या पडद्याआड गेला. तत्पूर्वीच म्हणजे १९८५ रोजी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर १९९२ मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले. शांताराम गेले असले तरीही त्यांची अमीट मुद्रा बॉलीवूडवर उमटली आहे. त्यांच्या सामाजिक चित्रपटांचा वारसा आता इतर काही दिग्दर्शक चालवू लागले आहेत.