Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ध्‍वनीचा किमयागारः रसुल पुक्कुट

ध्‍वनीचा किमयागारः रसुल पुक्कुट

विकास शिरपूरकर

ND
ऑस्‍कर पुरस्‍कार सोहळयात सर्वोत्‍कृष्‍ट ध्‍वनी तंत्रज्ञ म्‍हणून लखलखणारी सुवर्ण मूर्ती आपल्‍या नावी करणा-या रसुल पुक्कूटबद्दल आज प्रत्‍येक भारतीयाला अभिमान वाटतोय. हा पुरस्‍कार मिळविल्‍यानंतर भावूक होऊन बोलणा-या रसुललाही आपण सर्वांनी पाहिले. मात्र या चमचमणा-या यशामागे किती मोठा खडतर संघर्ष आहे. हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल.

आठ भाऊ बहिणींमध्‍ये सर्वांत लहान असलेल्‍या रसुलचा जन्‍म कोल्‍लाम जिल्‍ह्यातील एका छोट्याशा खेडे गावात झाला. एका बस कंडक्‍टरचा हा मुलगा डॉक्‍टर व्‍हावा अशी त्‍याच्‍या वडिलांची इच्‍छा होती. मात्र रसुलच्‍या मनात मात्र काही वेगळेच होते.

अभ्‍यास करण्‍याच्‍या आणि खेळण्‍या बागडण्‍याच्‍या वयातच जीवनाचे बाळकडू कोळून प्‍यायलेल्‍या रसुलने सहा-सहा कि.मी. पायी चालत जावून शालेय शिक्षण घेतले. गावात वीज नसल्‍याने तो रॉकेलच्‍या दिव्‍या खाली अभ्‍यास करायचा. जीवनाच्‍या या धबडग्यातून ध्‍वनी आणि मौनाची शिकवण त्‍याने घेतली. आणि पुढे हीच शिदोरी त्‍याला जीवनभरासाठी कामी आली.

कधी मोलमजुरी, कधी दुध विक्री तर कधी शिकवणी वर्ग या माध्‍यमातून त्‍याने शिक्षण पूर्ण केले. असे असले तरीही यासर्व कामातून सिनेमासाठी काही वेळ तो नेहमीच काढत असे. हेच तर त्‍याच्‍या कोरड्या आयुष्‍यासाठी एकमेव आएसिस होते. भौतिक शास्‍त्रातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर त्‍याने एल.एल.बी.साठी प्रवेश घेतला. मात्र कायद्याच्‍या पुस्‍तकांमध्‍ये रसुलचे मन काही रमेना. चित्रपटाचे ओयॅसिस त्‍याला साद घालत होते. अखेर एक दिवस त्‍याने कंटाळून कायद्याची पुस्‍तके दूर सारून तडक पुणे गाठले. पुण्‍यातील फिल्‍म अॅण्‍ड टेलीव्‍हीजन इन्‍स्‍टीट्युटमध्‍ये प्रवेशासाठी त्‍याने परीक्षा दिली. परीक्षेत उत्तीर्ण झाला तरीही पुढच्‍या गृप डिस्कशनच्‍या फेरीत मात्र तो अपयशी ठरला.

मग काहीही करून येथे प्रवेश मिळविण्‍यासाठी त्‍याने संपूर्ण वर्षभर भरपूर अभ्‍यास केला. साऊंड इंजिनीअरींग विषयाशी संबंधित अनेक पुस्‍तके वाचून काढली. अखेर मेहनत फळाला आली आणि दुस-या प्रयत्‍नात त्‍याला प्रवेश मिळाला.

या अभ्यासक्रमात भौतिकशास्‍त्रातील पदवीच्‍या शिक्षणाची त्‍याला खूप मदत झाली. या अभ्‍यासक्रमानंतर 'भारतीय हवामानाचा ध्‍वनीवरील प्रभाव' या विषयावर त्‍याने संशोधन करून एक प्रबंध सादर केला. त्‍याच्‍या या संशोधनाला जागतिक पातळीवर प्रसिध्‍दी आणि मान्‍यता मिळाली असून या संशोधनामुळे रसुलला जगभर ओळखले जाते.

आपल्‍या कारकिर्दीच्‍या सुरुवातीच्‍या काळात पडेल ते काम करणा-या रसुलने 1997 मध्‍ये 'प्रायव्‍हेट डिटेक्टीव्‍ह' चित्रपटातून आपल्‍या चित्रपट कारकिर्दीची सुरूवात केली. त्‍यानंतर अमिताभ बच्‍चन व राणी मुखर्जी यांचा ब्‍लॅक, गांधी- माय फादर, आणि गजनी सारख्‍या गाजलेल्‍या चित्रपटांसाठी त्‍याने साऊंड इंजीनिअर म्‍हणून काम केले. आपल्‍या कामाप्रतीचे समर्पण आणि तन्‍मयता याबद्दल चित्रपटसृष्‍टीत त्‍याचा नेहमीच आदर केला जातो.

स्‍लमडॉग मिलेनियरच्‍या कामाला सुरुवात झाल्‍यानंतर परफेक्‍शनची आवड असलेल्‍या रसुलने आपल्‍या कामात चित्रपटाचा दिग्‍दर्शक डॅनी बोएलचा हस्‍तक्षेप गरजेपेक्षा जास्‍तच असल्‍याने काहीच दिवसात चित्रपट सोडला होता. हे अनेक जणांना कदाचित ठावूक नसेल. मात्र नंतर बोएल यांनीच त्‍याची समजूत घालून त्‍याला पुन्‍हा चित्रपटात आणले. त्‍यानंतर मात्र त्‍यांनी अखेरपर्यंत त्‍याच्‍या कामात हस्‍तक्षेप केला नाही. आणि त्‍यामुळेच रसुलला मिळालेल्‍या ऑस्‍कर पुरस्‍काराचे महत्‍व अधिक आहे. बॉलीवूडपटांमध्‍ये सर्वसामान्‍य दर्शकांना माहितीही नसलेल्‍या साऊंड इंजीनिअरच्‍या कामाला पुक्कुटच्‍या यशाने ग्लॅमरची झळाळती किनार मिळवून दिली आहे.

तत्‍वज्ञ आणि साहित्यिक खलील जिब्रानच्‍या लेखनाचा रसुलवर प्रचंड प्रभाव आहे. म्‍हणूनच जिब्रानच्‍या 'ब्रोकन विंग्‍ज' या पुस्‍तकाने प्रभावित होऊन त्‍याने आपल्‍या मुलीचे नाव सालना असे ठेवले आहे. स्वतःच्‍या बळावर संगीत आणि आवाज या विषयाला वाहिलेला एक परिपूर्ण चित्रपट बनविणे हे त्‍याचे स्‍वप्‍न आहे. आणि ते सत्यात उतरविण्‍यासाठी त्‍याची धडपड सुरूच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi