शेर्लिन चोप्रा नामक नटीने (अभिनेत्री नव्हे) सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेय. आता बॉलीवूडमध्ये सोवळं राहून लक्ष थोडंच वेधून घेता येणार राव. त्यासाठी काय करायचं ते झीनत अमान वगैरे पूर्वसूरींनी सांगून नव्हे दाखवून ठेवलंय.
आपली मल्लिकाही (किती छान वाटतं नै) त्याचा मार्गावरून तर गेली. म्हणून तर यशस्वी (?) झाली. आता शेर्लिनही त्याच वाटेवर आहे. तिचा रेड स्वस्तिक नावाचा चित्रपट म्हणे नुकताच प्रदर्शित झालाय. त्यात तिने दिलेल्या हॉट दृश्यांमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सेंसॉर मंडळाच्या कचाट्यातून हा चित्रपट कसा काय सुटला याचे कोडे पडावे एवढी यातील दृश्ये गरमागरम आहेत.
विनोद पांडे नामक व्यक्ती या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी नजदिकियॉं, एक बार फिर आणि सच हे चित्रपट बनविले आहेत. (आठवतोय यातला एखादा तरी) त्यांच्या चित्रपटात म्हणे अशी दृश्ये असतातच. तर या पांडेसाहेबांच्या चित्रपटात शेर्लिन झळकली आहे. त्यात वासनेच्या माध्यमातून हवे ते साध्य करणाऱ्या तरूणीची भूमिका तिने केली आहे. यात चुंबन आणि बेडरूम सीनच्या दृश्यांची रेलचेल आहे.
आता भूमिकेची गरज म्हणून तिला असे सीन करावे लागतात, असे पूर्वसूरींनीच देऊन ठेवलेलं उत्तरही ती देईल. पण सांगायचा मुद्दा असा की हे दृश्य देतानाही ती कुठेही संकोचली नाही म्हणे. अगदी सहजगत्या पाण्यात शिरावं नि त्यातून बाहेर यावे अशा सहजतेने ही दृश्ये दिली आहेत.
आता ही शेर्लिन कोण असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर ती आहे मुळची आंध्र प्रदेशातील. मूळ नाव मोना चोप्रा. पंधरा वर्षांपर्यंत म्हणे ती अगदीच काकूबाई होती. चष्माबिष्मा लावून पुस्तकं बिस्तकं वाचत बसायची. कुणी तिच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. त्यानंतर तिने स्वतःत कमालीचा बदल घडवला. ( तो रेड स्वस्तिकमध्ये दिसतोच आहे.) मग ती मिस आंध्र बनली. पुढचा रस्ता चित्रपटसृष्टीकडे जाणारा होता.
तिचा पहिला चित्रपट टाईमपास नावाचा होता. त्यातच तिने एवढे अंगप्रदर्शन केले की आता काय दाखवायचे राहिले असा प्रश्न प्रेक्षकांना पडल्यावाचून राहिला नाही. त्यानंतर दोस्ती, जवानी दिवानी व नॉटी बॉय या चित्रपटात ती दिसली. ( हो तिने अभिनय केला असे लिहवत नाही.)
पण या चित्रपटांमुळे तिला काडीचाही फायदा झाला नाही. मग तिने नवा उपाय योजला आपलं नावच मोना बदलून शेर्लिन ठेवलं. त्यानंतर लगेच विनोद पांडे यांनी तिला रेड स्वस्तिकसाठी घेतलं. शेर्लिनला प्रसिद्धी कशी मिळवायची ते चांगलं माहित आहे. तिने आपले हॉ़ट फोटोसेशन करून घेतलं नि त्याचे फोटो दिले मासिकांना पाठवून. ते काय छापायलाच बसलेत. मग त्यांना फोटो आणि शेर्लिनला प्रसिद्धी मिळाली.
मध्यंतरी तिने एका अल्बमसाठी अॅडगुरू प्रल्हाद कक्कड यांच्याबरोबरही काम केलं. ( हा अल्बम म्हणे फक्त प्रौढांसाठी आहे.) त्यांच्या मते शेर्लिन अत्यंत आकर्षक दिसते. (ज्याला आंग्ल भाषेत सेक्सी असे म्हणतात.)
आता शेर्लिनच्या या पवित्र्याने मल्लिकाचे आसन डळमळीत झाले आहे. थेट तिच्या कृर्तृत्वाला आव्हान देणारी शेर्लिन भेटल्याने या दोघींमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार हे निश्चित. थोडक्यात काय सध्या दिवस डोळे उघडे ठेवण्याचे आहेत.