महाराष्ट्राची विजयी पताका फडकाविणार- वैशाली माडे
, शुक्रवार, 11 डिसेंबर 2009 (13:26 IST)
झी टिव्हीवर सुरू असलेल्या 'सारेगामापा मेगा चॅलेंज' या स्पर्धेची अंतिम लढत आता लवकरच होईल. महाराष्ट्र आणि कोलकता या दोन संघादरम्यान हा मुकाबला होणार असून महाराष्ट्राचे नेतृत्व वैशाली भैसने माडे या गुणी गायिकेकडे आहे, तर कोलकत्याची धुरा अभिजित घोषालच्या हातात आहे. वैशालीसाठी सारेगामाचे विजेतेपद नवीन नाही. मराठी सारेगामपमध्ये भाग घेऊन ती महागायिका ठरली होती. याशिवाय हिंदी सारेगामामध्येही ति विश्वगायिका झाली होती. आता या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या विजेत्यांमधून एक विजेता निवडला जाणार आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेची पूर्ण कल्पना आहे. 'आमच्या संघावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हीच ही स्पर्धा जिंकू ही खात्रीही आहे,' असा विश्वास तिने व्यक्त केला. पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहेचल्यानंतर कसे वाटते असे विचारले असता, 'तुम्ही कितीही वेळा स्पर्धा जिंकली असली तरी एकदा अंतिम फेरीत पोहेचल्यानंतर होणारी धडधड काही संपत नाही. पण तरीही आम्हीच जिंकू असे मला वाटते. या विजयाने महाराष्ट्राची पताका आम्ही पुन्हा एकदा फडकवू', असे वैशाली म्हणाली. सांगितक क्षेत्रात महाराष्ट्राचा आणि बंगालचाही दबदबा मोठा आहे. या दोन राज्यांनी अनेक गुणी कलावंत भारतीय संगीत क्षेत्राला दिले आहेत. आमची स्पर्धा चुरशीची होणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मी कमी लेखत नाही, असेही वैशाली विनम्रपणे म्हणाली. पण आम्ही जोरदार तयारी केली आहे. रियाजही चांगला केला आहे, हे सांगायला ती विसरली नाही. वैशालीने आतापर्यंत इथे पोहोचण्यासाठी खूपच संघर्ष केला आहे. विदर्भातील हिंगणघाटसारख्या मागास विभागातून आलेल्या वैशालीने मुंबईत येऊन सांगितिक क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले आहे. वैशालीच्या पतीचा आवाज एका अपघातात गेला आहे. आपल्या लहान मुलाला नि आजारी पतीची देखभाल करत वैशाली हा सांगितिक प्रवास करते आहे. या सगळ्यातून तुला प्रेरणा कशी मिळते, असे विचारले असता, या अडचणी हीच माझी प्रेरणा आहे, असे सांगून अडचणी नसतील असे आयुष्यच काय असा सवाल ती करते. प्रत्येकालाच काही ना काही अडचणी असतात. माझ्याही जीवनात त्या आहेत. पण मी त्याकडे आव्हान म्हणून पाहते, असे वैशाली सांगते. वैशालीला बॉलीवूडमध्ये सुस्थापित गायक व्हायचे आहे. सध्या ती मेगा फायनलसाठी मेहनत घेते आहे.