महेश मांजरेकर
'वास्तवा'चे योग्य 'निदान' करणारा दिग्दर्शक
विषयाचे वेगळेपण, त्यांची वेगळी मांडणी करणार्या दिग्दर्शकांमध्ये महेश मांजरेकर या मराठी माणसाचे नाव फार वर आहे. आपल्या चित्रपटांद्वारे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी नाट्यसृष्टीतून लेखन व दिग्दर्शकीय कारकीर्दीस सुरूवात करणार्या मांजरेकरांचा आई नावाचा चित्रपट आठवत असेल.
नीना कुलकर्णी व शिवाजी साटम यांच्या त्यात भूमिका होत्या. अतिशय संयत हाताळणी केलेला हा चित्रपट चांगला चालला होता. त्यानंतर मांजरेकर गेले हिंदीत. मुंबईतील गुन्हेगारी विश्व मांजरेकरांनी वास्तव या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे पडद्यावर आणले.
गुन्हेगारीत अडकलेली मुले व त्यांचे भावविश्व त्यांनी अतिशय छान रेखाटले होते. राम गोपाल वर्माच्या सत्यातही गुन्हेगारी असली तरी त्याला प्रेमकथेची जोड होती. पण मांजरेकांनी वास्तव मांडताना त्याला कुटुंबाशी जोडले. त्यामुळे त्याचा परिणामही व्यापक झाला. या पहिल्याच चित्रपटाने त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या.
'वास्तव' नंतर अगदी वेगळा विषय मांडणारा त्यांचा अस्तित्व हा चित्रपट आला. पतीच्या अनुपस्थितीत परपुरूषाशी संग करणार्या व ही बाब खूप वर्षांनी उघडकीस आल्यानंतर त्याची कबुली देऊन प्रसंगी घराबाहेरची वाट धरणारी स्त्री, असा चित्रपटाचा विषय. मांजरेकरांनी या कथेची हाताळणी अतिशय संयत व अभिजातपणे केली.
त्यामुळे चित्रपटाचा तोल कुठेही ढासळत नाही. विशेष म्हणजे पतीशी कोणतीही तडजोड न करता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेणारी स्त्री दाखवून मांजरेकरांनी आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीच्या पारंपरिक चौकटीत अडकलेल्या स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व दिले. यात तब्बूने कमालीचा सुंदर अभिनय केला. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले.
या चित्रपटाने मांजरेकरांच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब झाले. त्यांचा निदान हा चित्रपट एडस विषयावरचा होता. त्याची हाताळणीही छान केली होती. यानंतर मांजरेकर व्यावसायिक सिनेमाच्या धारेला लागले. पण त्यात यश तुलनेने कमी मिळाले, फक्त चर्चा जास्त झाली. रक्त, जिंदा, हथियार, कुरूक्षेत्र, पिता, जिस देश में गंगा रहता है यासारखे चित्रपट आले.
पद्मश्री लालू प्रसाद यादव हा काही दिवसांपूर्वीच आलेला विनोदी चित्रपटही फ्लॉप ठरला. काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. पण अभिनयापेक्षा दिग्दर्शन हेच क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य आहे, हे यातून स्पष्ट झाले. मधल्या काळातील काही पडेल चित्रपट सोडले तर नुकताच आलेला विरूद्धने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
व्यवस्थेविरोधात टक्कर घेणारा वृद्ध अशी या चित्रपटाची थीम होती. मांजरेकरांनी त्याची हाताळणी अतिशय छान केली. अमिताभ व शर्मिला टागोर यांना एकत्र आणून चरित्र अभिनेत्यांचे नवे कॉम्बिनेशन मांडले. ते यशस्वीही ठरले.
मांजरेकरांचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या चित्रपटात मराठी अभिनेत्यांना ते बराच वाव देतात. त्यामुळे चांगले अभिनेते असलेले पण केवळ मराठीपुरते मर्यादीत राहिलेल्या अनेकांना हिंदी चित्रपटांचे मोठे आभाळ खुले झाले.
हिंदीत राहूनही आपले मराठीपण जपणारा असा हा दिग्दर्शक आहे. मधल्या काळात काहीसे भरकटलेल्या मांजरेकांचा ट्रॅक योग्य मार्गावरच रहावा हीच सामान्य चित्रपट रसिकांची अपेक्षा असेल दुसरे काय.
महेश मांजरेकरांचे चित्रपट - वास्तव, मुसाफिर, जिंदा, रक्त, रन, हथियार, तेरा मेरा साथ रहे, हथियार, जिस देश मे गंगा रहता है, एहसास, प्लान, पद्मश्री लालू प्रसाद यादव, प्राण जाय पर चाल न जाय, निदान, विरूद्ध, कुरूक्षेत्र, अस्तित्व, आई (मराठी)