'वीर'ची राजकन्या- झरीन खान
, मंगळवार, 12 जानेवारी 2010 (13:28 IST)
आमिर खानने 'गझनी'मध्ये असीनला शाहरूख खानने 'रब ने बना दी जोडी'मध्ये अनुष्का शर्माला ब्रेक दिला. या दोघी त्यांच्या वयापेक्षा बर्याच कमी आणि नव्या तारका होत्या. आता सलमान खानही त्यांचीच वाट चोखाळतो असून वीर या त्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या चित्रपटात झरीन खान या युवतीला त्याने आपली नायिका बनण्याची संधी दिली आहे. झरीनचे नाव पुढे आल्यानंतर तिच्याविषयी उत्सुकता दाटून आली आहे. ही झरीन आहे तरी कोण असा सवाल विचारला जात आहे. झरीनचा चेहरा कतरीना कैफशी साधर्म्य साधणारा असल्याने ही उत्सुकता आणखी वाढली आहे. कदाचित त्यामुळेच सलमानने तिला नायिका बनवली असली पाहिजे असे बोलले जात आहे. सलमानने असा प्रयोग या आधीही केला होता. ऐश्वर्या रायसारख्या दिसणार्या स्नेहा उलाललाही त्याने संधी दिली होती. पण सलमान मात्र या सगळ्या बातम्यांचे खंडन करतो. कतरीनाला या चित्रपटात घ्यायचे असते तर तिलाच घेतले असते, तिच्यासारख्या दिसणार्या कुणालाही नाही, असे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. बॉलीवूडमध्ये नवी नायिका आल्यानंतर तिला लोकांसमोर लगेचच आणले जात नाही. माध्यमांपासूनही तिला लपवले जाते. हळूहळू तिला लोकांसमोर आणि माध्यमांसमोर आणले जाते. झरीनच्या बाबतीतही तेच केले जात आहे. यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढते असा बॉलीवूडकरांचा होरा आहे. झरीनला सलमानने प्रथम युवराजच्या शुटींगवेळी पाहिले. मुक्ता आर्टसकडून तिला फोन करून बोलविण्यात आले होते. त्यावेळीच ती सलमानला भेटली होती. झरीनने त्यावेळी सलमानकडे ऑटोग्राफ मागितला होता. मात्र, पुढील काही काळात तीच इतरांना ऑटोग्राफ देताना दिसेल असे सलमानने झरीनला सांगितले. युवराजनंतर सलमान आणि अनिल शर्मा वीरसाठी नायिकेचा शोध घेत होते. त्यावेळी सलमानला झरीन आठवली. आणि वीरला नायिका मिळाली. मुंबईत रहाणारी झरीन कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे मॉडेलिंगकडे वळाली. घर चालविण्याचे ओझे तिच्याच खांद्यावर आहे. हुशार असूनही तिला परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. मॉडेलिंगसाठी शिक्षण फारसे आवश्यक नाही हे हेरून झरीन या क्षेत्रात आली. झरीन एकेकाळी चांगलीच लठ्ठ होती. पण मॉडेलिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर तिने जाणीवपूर्क वजन कमी केले. सलमानने झरीनला आणखी जन कमी करायला सांगितले. सलमानच्या सूचनेखातर तिला निवडण्यात आले होते. त्यामुळे सलमानने तिच्या अभिनयापासून ते तिच्या गेटअपपर्यंत सर्व बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष दिले. झरीन वीरमध्ये राजकन्येच्या भूमिकेत आहे. कतरीना व झरीनच्या चेहर्यात नक्कीच साम्य आहे. पण झरीनला ते मान्य नाही. कतरीना खूपच सुंदर आहे आणि माझी व तिची तुलनाच होऊ शकत नाही, असे तिचे म्हणणे आहे. आता खानांच्या बॉलीवूडमध्ये ही 'लेडी खान' काय धमाल करते ते आगामी काळात पाहूया.