Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रद्धेमुळेच रामायण माझ्या चित्रपट, मालिकांत - सूरज बडजात्या

श्रद्धेमुळेच रामायण माझ्या चित्रपट, मालिकांत - सूरज बडजात्या
IFMIFM
राजश्री प्रॉडक्शन म्हटले की प्रेम आणि संस्कृती या विषयाला वाहिलेले चित्रपट डोळयासमोर येतात. गेली कित्येक वर्षे भारतीय संस्कृतीची मुल्ये बडजात्या परिवाराने चित्रपटाच्या माध्यमातून जपली आहेत. ब़डजात्या कुटुंबीयांतील सूरज बडजात्या यांनी ‘मैंने प्यार किया', ‘हम आपके है कौन', ‘हम साथ साथ है' या चित्रपटांमधून भारतीय कुटुंब संस्काराचे मुल्य जपले.

जमाना बदलला तरी बडजात्यांच्या चित्रपटाचा हा साचा मात्र कायम राहिला आहे. सूरज बडजात्यांनीही आपल्या चित्रपटांसाठी कोणतीही तडजोड केली नाही. म्हणूनच बोल्ड चित्रपटांच्या गर्दीतही बडजात्यांचे चित्रपट उठून दिसतात. चित्रपटांच्या माध्यमातून लोकांसमोर येणारे बडजात्या मालिकेच्या माध्यमातूनही आपली शाश्वत मुल्ये मांडत आहेत. म्हणूनच त्यांच्या सहारा वन वाहिनीवर सुरू असलेल्या वो रहनेवाली महलोंकी या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. यासंदर्भातच सूरज यांच्याशी संवाद साधला. त्याचा हा वृत्तांत.

● छोट्या पडद्यावर राजश्री प्रॉडक्श्ननचे पदार्पण उशिरा झाले असे नाही का वाटत?
- नाही तसे काही नाही, ८० च्या दशकात राजश्रीने टेलिव्हिजनसाठी ‘पेईगगेस्ट’ नावाची मालिका बनवली होती. त्या मालिकेमध्ये एक वृध्द दांपत्य लॉज चालवत असतात. त्यात वेगवेगळया प्रकारचे पाहुणे येतात त्यांची स्वप्ने आणि संघर्ष त्यात होता. त्यावेळच्या मध्यमवर्गीयांच्या सामाजिक अस्तित्वाबद्दलचे भाष्य त्यात होते.

● मग मालिका मध्येच थांबवण्याचे कारण?
- आतासारख्या अमर्यादित भागांच्या मालिका पूर्वी नसायच्या. तेव्हा दूरदर्शनच्या एक किंवा दोनच वाहिन्या होत्या त्यामुळे मालिका मर्यादित भागाच्या असायच्या आणि चॅनेलबरोबर करारही करावा लागायचा. आमच्या त्या मालिकाचा करारही संपला होता आणि भागही संपले होते. आता तर फार लवकर सगळयामध्ये बदल झाला आहे. प्रेक्षकही बदलले आहेत. त्यांची आवड निवड़ही काही प्रमाणात बदलली आहे. आमच्या बॅनरची निर्मिती पाहणारा प्रेक्षक सोज्वळ आहे.

● ‘वो रहने वाली महलों की' मध्ये वेगळे काय आहे?
- या मालिकेची कल्पना परसेप्टचे एम.डी द्यौलेंद्र सिंग यांच्याकडून मिळाली. एकदा ते मला म्हणाले, '‘आपल्या संस्कारांचे अनुकरण व्हावे असे काही कर. माझ्या मुलाने रामायण वाचावे अशी माझी इच्छा आहे''. त्यांच्या या बोलण्यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि आमच्या आवडीनुसार आम्हाला एक विषयही मिळाला. '‘वो रहने वाली महलों की'' मध्ये आयुष्याची प्रकाशलेली बाजू दाखवण्यात आली आहे. यात कोणीही खलनायक नाहीये. मी आशावादी असून मला हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी यांचे अनुकरण करायला आवडते. थोडक्यात सांगायचे तर यात आयुष्यातील सुखाच्या शोधाविषयीची कथा आहे.

● सहारा वन वाहिनी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असतानाही तुम्ही तुमची मालिका या वाहिनीवर का प्रक्षेपित केली?
- मला तसे वाटत नाही. त्यांनी मला ऑफर दिली आणि निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. या वाहिनीची निवड करण्यासाठी इतके कारण पुरेसे होते. वाहिनीचा टिआरपी रेटिंग हा वादाचा भाग नाहीये. कार्यक्रम चांगला असेल तर लोक आवर्जून पाहतील. आणि कार्यक्रमच चांगला नसेल तर चांगली वाहिनी असली तरी यशाची खात्री देता येत नाही. आम्ही यशस्वीरित्या या मालिकेचे ५०० भाग पूर्ण केले आहेत आणि पुढेही या मालिकेची लोकप्रियता अशीच राहील.

● तुमच्या प्रत्येक चित्रपटात आणि आता या मालिकेतही रामायण किंवा श्रीराम आणि सीता यांचे मंदिर असतेच याचे काही कारण?
- कारण असे काही नाही, माझी रामायणावर श्रध्दा आहे आणि आमच्या मोठया एकत्र कुटुंबामध्येही आम्ही रामायणाचे अनुकरण करतो. देवावर माझा विश्वास आहे आणि तो सर्वत्र आहे. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे मला असे वाटते की त्यांनी मला इतके काही दिले आहे तर ते ज्ञान किंवा त्यांच्या भक्तीचे अनुकरण इतरांनाही करता यावे म्हणून माझ्या सर्व चित्रपटामध्ये आणि आता या मालिकेमध्येही मी रामायणाचे अनुकरण करतो. रामायण वाचल्यावर आपल्या सर्व समस्याचे निराकरण होते असा माझा अनुभव आहे. तो मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवू इच्छितो बस!

● तुमचा ‘मै प्रेम की दिवानी हॅ' अपयशी ठऱला. त्याचे कारण काय?
- हे पहा आयुष्यात यश अपयश येतच असतात आणि अपयशातूनच माणूस शिकत असतो. तसे पाहिले तर आताचे अपयश हेच तुमच्या भविष्यातील यश असते. त्यामुळे अपयशातूनच यशाचा मार्ग शोधावा लागतो. चित्रपटात यश आणि अपयश असणारच!

● तुमच्या नवीन प्रोजेक्टबद्दल काही?
- नवीन चित्रपटांवर माझे काम सुरू आहे. मालिकांचे काम तर माझी बहीण कविता बडजात्या पाहते आहे. टेलिव्हिजनची जबाबदारी ती योग्यरित्या पार पाडते आहे. पुढील दोन वर्षात माझे दोन-तीन चित्रपट येण्याची शक्यता आहे ज्यावर काम सुरू आहे. यामध्ये माझे कुटुंबीय मला नेहमीच मदत करत आले आहेत.

-- दीपक जाधव

Share this Story:

Follow Webdunia marathi