सोमवारपासून इंडियन आइडलची सुरुवात
सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रियालिटी शो इंडियन आइडलचे ५ वे सत्र सोमवार २६ एप्रिलपासून सुरू होत आहे. यंदा इंडियन आइडलसाठी १ लाख तरुण-तरुणींनी ऑडिशन दिली होती. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी एखाद्या रियालिटी शोला प्रतिसाद दिल्याची माहिती सोनी टीव्हीचे सीओओ एनपी सिंह यांनी वेबदुनियाला दिली. दिल्ली येथे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते.इंडियन आइडल ५ यंदा सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. पहिला इंडियन आइडल अभिजीत सावंत आणि पहिल्या इंडियन आइडलच्या अंतिम पाचमध्ये पोहोचलेली प्राजक्ता शुक्रे कार्यक्रमाचे निवेदक आहेत. अनू मलिकसोबत सुनिधी चौहान आणि सलीम-सुलेमान संगीतकार जोड़ीमधील सलीम मर्चंट कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. कार्यक्रमाला सुनिधी आणि सलीम हजर होते परंतु अनु मलिक हजर नव्हता. यावेळी सुनीधी, अभिजीत, प्राजक्ता आणि सलीम मर्चंट यांनी गाणीही गायली.वेबदुनियाशी गप्पा मारताना मल्टीस्क्रीन मीडिया (सोनी टीव्हीची कंपनी) चे सीओओ एनपी सिंह यांनी सांगितले, या कार्यक्रमाद्वारे आम्ही देशातील तरुण पिढीला मोठी स्वप्ने पाहाण्यास प्रेरित करीत आहोत. इंडियन आइडलच्या पहिल्या सत्रापासून याची लोकप्रियता वाढत चालली आहे. पहिल्या इंडियन आइडलच्या वेळी २५ हजार तरुण-तरुणींनी ऑडिशन दिली होती तर यावेळेस १ लाख तरुण-तरुणींनी ऑडिशन दिले. त्याचप्रमाणे या वेळेस आम्ही ५० कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू असा आम्हाला अंदाज आहे. गेल्या वेळेस आम्ही ४८ कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो होते. सुनिधी चौहान ने वेबदुनियाशी बोलताना सांगितले, या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करताना मला खूप आनंद होत आहे. या शोमुळे माझ्या प्रशंसक पिढ़ीबरोबर मला संवाद साधता आला. १ लाख तरुण-तरुणींमधून १७-१८ तरुण-तरुणींची निवड करण्याचे काम सोपे नव्हते. आता तर आमची खरी परीक्षा सुरू झाली आहे. सुनिधीला जेव्हा विचारले की यावेळेस एखादी मुलगी इंडियन आइडल व्हावी असे वाटते का? यावर सुनिधीने उत्तर दिले, ज्याचा आवाज चांगला असेल तोच इंडियन आइडल होईल. संगीतकार सलीम मर्चंटही प्रथमच परीक्षक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. सलीमने सांगितले, माझ्यासाठी ही स्पर्धा म्हणजे एक वेगळा अनुभव आहे. यामुळे मला देशातील युवा पिढीच्या कलेचे दर्शन झाले.