यशाशी 'दोस्ताना'
प्रियंका चोप्रा आज (ता.१८ जुलै) वयाची २७ वर्षे पूर्ण करतेय. आघाडीच्या नायिकांमध्ये तिची गणना होतेय. गेल्या वर्षभरात तिची स्टार व्हॅल्यू भलतीच वाढली आहे. 'दोस्ताना' आणि 'फॅशन' च्या निमित्ताने तिला खणखणीत यश मिळाले आहे. त्यामुळे तिच्यावर अपयशाचा ठपका ठेवणार्यांची तोंडे बंद झाली आहेत. 'दोस्ताना'मध्ये ग्लॅमरस दिसलेल्या प्रियंकाने फॅशनच्या माध्यमातून आपल्याला अभिनयही येतो, हे दाखवून दिले आहे.
मैत्र जीवांचे
प्रियंकाच्या फिल्मी जीवनाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चाही बरीच होते. हरमन बावेजासोबत तिचे संबंध संपुष्टात आले. मग शाहिद कपूरबरोबर तिचे नाव जोडले गेले. आत्ताही ती शाहिदबरोबर आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. मध्यंतरी एका पाश्चिमात्य अभिनेत्यासमवेत तिचे नाव जोडले गेले होते. प्रियंका स्वतः याविषयी काहीही बोलत नाही. अभिनयाला माझे प्राधान्य आहे हे सांगायला मात्र ती विसरत नाही.
प्रियंकात आहे तरी काय?
प्रियंकाने अनेक अयशस्वी चित्रपट दिले तरीही तिला काम मात्र मिळत राहिले. याचे कारण ती अत्यंत व्यावसायिक आहे. शिस्तबद्ध आहे आणि मेहनतीही आहे. सेटवर ती कधीही नखरे करत नाही. निर्मात्याला त्रास देत नाही. वडिल आजारी असतानाही ती शुटींग करत होती, यावरून काय ते लक्षात घ्यावे. सलग शुटींग केल्यामुळे ती एकदा बेशुद्ध पडली होती. तिच्या या समर्पण वृत्तीमुळेच निर्माते तिला आपल्या चित्रपटात घ्यायला उत्सुक असतात.
नव्या आकाशाकडे....
'कमीने', 'प्यार इम्पॉसिबल', 'व्हॉट इज यूवर राशी' हे तिचे आगामी चित्रपट आहेत. अनुक्रमे यशराज फिल्म्स, आशुतोष गोवारीकर आणि विशाल भारद्वाज हे त्यांचे निर्माते आहेत. यातल्या प्रियंकाच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून तिच्या अभिनयाचे नवनवे पैलू दिसतील, अशी अपेक्षा आहे. प्रियंकाच्या अभिनयाचे नवे आकाश यातून सापडेल ही अपेक्षा. प्रियंकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.