Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

Swami Samarth Prakat Din 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?

Swami Samarth Prakat Din 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?
, सोमवार, 24 मार्च 2025 (16:11 IST)
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेले. स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याची मान्यता आहे. 
 
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.
 
स्वामी समर्थ प्रकट दिन
इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता. यंदा म्हणजेच २०२५ मध्ये सोमवार ३१ मार्च रोजी प्रकट दिन वा स्वामी समर्थ जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. 
 
“स्वामी समर्थ तारक मंत्र”
नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||
 
कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात.
 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचे नामस्मरण, मंत्र, जप, स्त्रोतांचे पठण किंवा श्रवण करावे. तसेच या दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे.
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय
माहिती
स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाल्याचे समजले जाते. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापूरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले होते. दरम्यान एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत होता तेव्हा त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. हे निमित्त् समजा कारण स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तेच होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.
 
आपल्या हातून महापुरुषाला जखम झालेली बघून उद्धवाला दुःख झाले तसेच त्याला भय देखील वाटू लागले. पण महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करत ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
अवतार कार्य समाप्ती
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केल्याचे भासवले. श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. स्वामींनी इसवी सन १८७८ मध्ये त्यांचे अवतार कार्य संपले असले तरी स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Eid-Ul-Fitr 2025 भारतात ईद कधी आहे, ३१ मार्च की १ एप्रिल? चंद्र बघण्याची तारीख आणि महत्त्व जाणून घ्या