Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे- मुख्यमंत्री

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे- मुख्यमंत्री
नियमित आणि वेळेत केलेल्या औषधोपचाराने स्वाईन फ्लू हा आजार पूर्ण बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी मनात भीती न बाळगता या आजाराबाबत दक्षता घ्यावी. तो संसर्गजन्य असल्याने सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणार्‍या व्यक्तींनी श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव तसेच रमजानच्या काळात गर्दीत जाण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

राज्यात स्वाईन फ्लू या आजाराची लागण काही नागरिकांना झाली आहे. आगामी काळात दहीहंडी, गणेशोत्सव आणि रमजान हे गर्दी होणारे सण आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळ, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीतील पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या बैठकीस उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव जॉनी जोसेफ आदी राजकीय नेत्यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, गणेशोत्सव मंडळे तसेच गोविंदा पथकांच्या समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती दिली. शाळा तसेच महाविालये बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री लक्ष घालून त्याबाबत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधतील. सोमवारी सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यात २७६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यापैकी १९४ व्यक्ती उपचारानंतर पूर्ण बर्‍या झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच संशयित म्हणून तपासणीसाठी आलेल्या मात्र या आजाराची लागण न झालेल्या अशा ८४९ व्यक्तींनाही घरी पाठविण्यात आले आहे.

सर्वपक्षीय आवाहन
आगामी काळात श्रीकृष्ण जन्माष्टमी (दहीहंडी), गणेशोत्सव आणि रमजान हे महत्त्वाचे धार्मिक उत्सव आहेत. त्यामुळे या सणांच्या निमित्ताने गर्दी होत असली तरी त्यांच्यावर निर्बंध घालू नयेत असे यावेळी सर्वानुमते ठरले. मात्र उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी त्यातही विशेषतः सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असणार्‍यांनी गर्दीत जाऊ नये, असे सर्वपक्षीय आवाहन या बैठकीत करण्यात आले.

दहीहंडीची उंची आणि पारितोषिकांची रक्कम कमीत कमी ठेवावी तसेच दहीहंडीसाठी मानवी मनोरा उभारतांना पाण्याचा वापर करू नये, असे आवाहनही सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी केले. शासनामार्फत करण्यात येणार्‍या उपाययोजना आणि सर्व जनतेचे सहकार्य याद्वारे स्वाईन फ्लू या आजारावर मात करण्यात यश येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi