Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत आठवडाभर शाळा, कॉलेज बंद

तीन दिवस थिएटर्स बंद

मुंबईत आठवडाभर शाळा, कॉलेज बंद
मुंबईतील स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या दिनांक 13 ऑगस्टपासून बृहन्मुंबई क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस इत्यादी शैक्षणिक संस्था सात दिवसांकरिता; तर, मुंबईतील सर्व थिएटर्स तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबतचे आदेश काढण्यात येत आहेत. स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मुंबईतील जनतेने आगामी उत्सव काळात गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.

मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, विविध सणांच्या पार्श्र्वभूमीवर मुंबईतील मॉल्स विविध प्रकारचे सेल आणि सवलती जाहीर करीत आहेत. त्यांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करत आहेत. त्यांनी आपले सेल वगैरे गोष्टी काही दिवसांसाठी पुढे ढकलाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, स्वाइन फ्ल्यूमुळे नाशिकमध्ये सुद्धा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिथूनही अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी जमण्यास बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. मात्र याबाबत सरसकट निर्णय न घेता स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

तीस- चाळीस विद्यार्थी एकत्र येऊन साथीचा फैलाव होऊ नये म्हणून आपण जर एवढी खबरदारी घेत आहोत तर उत्सव काळात जनतेने हजारो आणि लाखोंच्या संख्येने गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. स्वाइन फ्ल्यू संदर्भात राज्य शासन 24 तास परिस्थितीवर नजर ठेवून आहे. त्याचबरोबर विविध माध्यमांतून जनजागृतीपर मोहिमही चालविण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांनी या जनजागृतीमध्ये मोलाचा सहभाग घेतल्याबद्दल श्री. भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले.

Share this Story:

Follow Webdunia marathi