स्वाईन फ्लूचा देशातील पहिला बळी पुण्यातील शाळकरी मुलगी ठरल्यानंतर आता या रोगाची लागण मुंबईत पाच जणांना झाली आहे. यासाठी महानगर पालिका खडबडून जागी झली आहे. स्वाईन फ्लू विषयी तीव्र चिंता आज पालिका सभागृहात व्यक्त करण्यात आली. मुंबईत स्वाईन फ्लूची चाचणी परळ, हाफकीन इन्स्टिटयूटमध्ये केली जाणार असून त्याचा रिपोर्ट २४ तासात मिळणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिली.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी कस्तूरबा रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात खाजगी रुग्णालयांशी चर्चा सुरु असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. काल १९ रुग्णांना स्वाईन फ्लू असल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यातील पाच जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे निश्चित झाले असून १४ जणांचा रिपोर्ट अजून येणे बाकी असल्याचे त्या म्हणाल्या . मात्र या १४ रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विभागात डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचे पथक तैनात ठेवण्यात येईल. शाळा परिसरात देखील खबरदारीचे उपाय केले जातील असेही म्हैसकर यांनी सांगितले.