स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आता पुणे संपूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत शाळा, कॉलेजे, मल्टिप्लेक्स पुढच्या आठवडाभराकरीता बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. चित्रपटगृहेही तीन दिवस बंद रहातील.
जिल्हा प्रशासनाने लोकांना घरीच रहाण्याचा सल्ला दिला असून विशेषतः जे आजारी आहेत त्यांनी तर गर्दीच्या ठिकाणी जाऊच नये असे सांगितले आहे. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सुटीचा फायदा घेऊन पिकनिक वा एकत्र येण्याचे अन्य कार्यक्रम करू नयेत. असेही ते म्हणाले. मॉलही बंद ठेवण्याचा सल्ला दिला जात असला तरी सध्या ते शक्य नाही, म्हणून मल्टिप्लेक्स बंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पुण्यात स्वाइन फ्ल्यूचा प्रसार अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकट्या रविवारी स्वाइन फ्लूचे ४२ रूग्ण शहरात सापडले. २८० रूग्णांची सरकारी रूग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यातल्या ४२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले.
सरकारने प्रतिबंधात्मक उपाय योजूनही हा रोग आटोक्यात आलेला नाही. रिदा शेखनंतर बाबासाहेब माने या डॉक्टरचाही या रोगाने मृत्यू झाल्यामुळे या रोगाला आळा घालण्यासाठी हे कठोर उपाय योजण्यात आले आहेत.
सध्या पुण्यात स्वाइन फ्ल्यूचे सहा रूग्ण असून त्यातचे चार व्हेंटिलेटरवर आहेत तर दोघांना कोणत्याही क्षणी डिसचार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. या सर्वांना ससून रूग्णालायात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूच्या संशयित रूग्णांना टॅमिफ्ल्यू गोळ्या द्याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.
आज डॉ. माने यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील उपचारात हॉस्पिटलने दिरंगाई केली असा आरोप त्यांचे काका सोमनाथ जाधव यांनी केला आहे. स्वाइन फ्ल्यूची चाचणी उशिरा करण्यात आली आणि त्यामुळे उपचारातही दिरंगाई झाली असे त्यांचे म्हणणे आहे.