Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वाइन फ्लूवर मुख्यमंत्री म्हणतात, की...

स्वाइन फ्लूवर मुख्यमंत्री म्हणतात, की...

मा. अशोक चव्हाण

इनफ्ल्यूएन्झा ए (एच १ एन १) वर उपचार सुरू असताना पुण्यात एका शाळकरी मुलीचा दुर्देवी मृत्यु झाला आणि पुणे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं. विशेषत: पालकांनी चिंतातूर होऊन रुग्णालयांमध्ये धाव घेतली. मुंबईमध्येही लोकांनी या आजाराचा धसका घेतला. या रोगाचा फैलाव भारतात वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या निमित्तानं मी राज्यातील नागरिकांना हे सांगू इच्छितो की, शासनातर्फे आवश्यक काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

PTI
PTI
सरकारी रुग्णालयांमध्ये वाढती गर्दी पाहून खाजगी दवाखान्यांना इनफ्ल्यूएन्झा ए (एच १ एन १) ची तपासणी करण्यासाठी परवानगी देण्याची माहिती आम्ही घेत आहोत. मुंबई-पुणे या शहरात पालिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त तपासणी केंद्रे उघडण्यात येत आहेत. BMC च्या रुग्णालयात Isolation Wards सुरू करण्यात येत आहेत. लोकांनी panic होऊ नये म्हणून योग्य रितीने वस्तुस्थितीची माहिती देणं सर्वात महत्वाचं आहे. यादृष्टीनं मी आरोग्य विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रोजच्या रोज यासंदर्भात घेण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती, रूग्णालयांची माहिती जनतेला कळली तर, भीतीचं वातावरण कमी होऊन या रोगाचा व्यवस्थित मुकाबला करता येणं शक्य होईल.

काही दिवसांपूर्वीच आम्ही पुणे, सातारा जिल्ह्यात साथरोग कायदा लागू केला आहे. सातारा जिल्ह्यात पाचगणीसह इतर तीन ठिकाणी Control Rooms सुरू करण्यात आल्या असून सातारा जिल्हा रूग्णालयातही Isolation Ward उभारण्यात आला आहे. पुणे-मुंबई ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यासाठी रेल्वे, एस.टी., टॅक्सीजच्या माध्यमातून या रोगाची माहिती देणं आवश्यक आहे. ती पाऊलेही आम्ही उचलली आहेत.

यापूर्वी रोगाच्या निदानासाठी लाळेचे नमुने पुण्याला National Institute of Virology मध्ये पाठवावे लागत. आता मुंबईला Haffkine Institute मध्येही ते तपासण्याची सोय केली आहे. पालिकेला तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही आम्ही दिल्या आहेत. या रोगाची लक्षणे सर्वसामान्य flu सारखी असल्याने flu झालेल्या व्यक्तीही आपापल्या डॉक्टर्सकडे धाव घेत असल्याचं चित्र दिसतंय. WHO च्या एका प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे, जागतिक पातळीवर सर्वसामान्यरित्या रूग्णांमध्ये याचा संसर्ग मध्यम स्वरूपाचा (Mild) आढळला आहे. तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या आणि वारंवार ताप येणार्‍या रूग्णांनाच रूग्णालयांमध्ये विशेष Antiviral Treatment घेण्याची गरज असते. साहजिकच रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून योग्य सल्ला मिळणं गरजेचं आहे.

या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांच्या समन्वयानं काम करण्याची गरज आहे. हा आरोग्याशी निगडित प्रश्न असल्यानं Medical profession मधील प्रत्येकानं कुठलाही हलगर्जीपणा न करता जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi