अनेकदा कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) ऑनलाईन खाते अपडेट न झाल्यामुळे ते बंद पडल्याचे प्रकार घडतात. त्यातून कर्मचार्याला पीएफ खात्यातून पैसे काढणे कठीण होऊन जाते. परंतु आता कर्मचार्याला ऑनलाईन माहिती अपडेट करता येणार असल्यामुळे ही प्रक्रिया सोपी होणार आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) कर्मचार्यांच्या ऑनलाईन अकाऊंटमध्ये त्यासंदर्भातील माहिती नोकरी सोडल्यानंतर तत्काळ अपडेट करता येणार आहे. आतापर्यंत नोकरीवर नियुक्त करणार्या कंपनी किंवा संस्थेलाच ही माहिती अपडेट करणे शक्य होते. परंतु त्यांच्याकडून अनेकदा टाळाटाळ होत असल्यामुळे कर्मचार्यांचे पीएफ खातेच बंद पडण्याचे प्रकार वाढले होते. नोकरी सोडल्याची तारीख अपडेट नसल्याने कर्मचार्याला पीएफ खात्यातून पैसे काढण्यात अडचणी येत होत्या. खाते बंद पडल्यामुळे कर्मचार्यांना पैसे काढण्यासाठी दीर्घकालीन प्रक्रियेत अडकून पडावे लागत होते.