विमानातून प्रवास करताना स्मार्टफोन एअरप्लेन मोडमध्ये टाकणं आपल्या सवयीचं झालं आहे. एकदा फोन एअरप्लेन मोडमध्ये टाकला की जगाशी आपला संपर्क तुटतो. पण आता विमान सफर करतानाही तुम्हाला फोनवर बोलता येईल. युरोपियन युनियनने यासंदर्भात परवानगी दिली आहे.
एअरलाईन्स प्रवाशांना 5जी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन फोनची सुविधा देऊ शकतात. कमी गतीच्या मोबाईल डेटाच्या माध्यमातूनही विमान सफर करताना संपर्क करता येऊ शकेल. प्रवाशांना विमानातून प्रवास करताना फोन एअरप्लेन मोडमध्ये टाकायची आवश्यकता नाही, पण याची नेमकी अंमलबजावणी कशी होणार याबाबत स्पष्टता नाही.
विमानात 5जी फ्रिक्वेंसी उपलब्ध करून देण्याची तारीख 30 जून 2023 आहे.
अशी सेवा उपलब्ध झाली तर प्रवाशी विमानातून जाताना कॉल करू शकतील, घेऊ शकतील तसंच लाईव्ह स्ट्रीमिंगचाही आस्वाद घेऊ शकतील.
आकाशात असताना इंटरनेटविना राहावं लागण्याची आवश्यकता नाही. वेगवान तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
या सेवेमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सेवासुविधा मिळू शकतील तसंच युरोपातील कंपन्यांना मोठं होण्याची संधी आहे, असं युरोपियन युनियनचे कमिशनर थिअरी ब्रेटन यांनी सांगितलं.
एअरप्लेन मोड बंद होणार का?
युरोपियन कमिशनने 2008 पासून विमानसेवांसाठी काही बँन्ड्स राखीव ठेवले आहेत. जेणेकरून आकाशात असताना इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देता येईल.
पण ही सेवा कूर्म गतीची होती. यासाठी उपकरण आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून प्रवाशांना कनेक्ट व्हावं लागे. 5जी तंत्रज्ञानामुळे वेगवान पद्धतीने इंटरनेट उपलब्धता होईल.
1000 एमबीपीएस वेग असल्यामुळे विमानात बसल्या बसल्या चित्रपटही डाऊनलोड करता येईल.
मोबाईल उपकरणांचा विमान यंत्रणेला किती फटका बसेल याविषयी विस्तृत माहिती नसल्याने एअरप्लेन मोड वापरण्यात येत असे, असं युके फ्लाईट सेफ्टी कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेई विटिंघम यांनी सांगितलं.
ऑटोमॅटिक फ्लाईट कंट्रोल सिस्टममध्ये मोबाईलची यंत्रणा बाधा आणू शकते अशी भीती होती.
पण ही भीती अनाठायी असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण तूर्तात विमानात गेल्यावर फोन फ्लाईट मोडवर टाका, असं सांगण्यात येतं.
5जी तंत्रज्ञानच्या माध्यमातून लहरी विमान यंत्रणेत व्यत्यय आणू शकतात अशी काळजी व्यक्त करण्यात येत आहे.
पण युके तसंच युरोपियन युनियनमध्ये ही समस्या नसल्याचं विटिंघन यांनी सांगितलं.
5जी साठी वेगळी यंत्रणा आहे. प्रवाशांना 5जी सेवा हवी आहे. विमानाची सुरक्षितता हेच सर्वोत्तम प्राधान्य असेल. काळजी घेऊनच ही यंत्रणा राबवली जाईल.
Published By- Priya Dixit