देशात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे.त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या प्रचाराच्या तोफा आज (सोमवार) थंडावतील. महाराष्ट्र आणि हरियाणात 15 ऑक्टोबरला मतदान आहे.
पंधरा दिवसांपासून एकमेंकांना आव्हान देणारी देते रविवारी मात्र मतांसाठी आवाहन करताना दिसून आले. निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावतील. भाजपचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला दंडवत घातले तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील युती तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडीत फूट पडल्याने यंदा पाच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्यात मतदारराजा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकतो हे 19 ऑक्टोबरला समजणार आहे.
भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात पहिल्यादा बाहेरील राज्यातील नेते उतरवले आहेत. कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रासह हरियाणात प्रचार करताना दिसत आहेत.