विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु झाले असूनही महायुती तसेच आघाडीचा जागावाटपाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. विरोधक तर तोडाच मित्रपक्षातील नेतेच एकमेकांवर टिकेच्या फैरी झाडताना दिसत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडकडून टीका केली. कर्मदारिद्रीपणा करू नका, अशा भाषेत ठाकरे यांनी मित्रपक्षावरच तोंडसुख घेतले. ठाकरे मुंबईतील मेळाव्यात संबोधित करत होते.
आघाडीला सत्तेवरून खेचण्याच्या उद्देशानेच युतीची स्थापना झाली आहे. शिवसेनाप्रमुखांचे प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी मला कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे. परंतु भाजपमधील नेते कर्मदारिद्रीपणा करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.
देशात भाजपची सत्ता आहे. त्यांना मित्रपक्षाची गरज नाही. चांगले आहे. लोकसभेत कॉंग्रेसचा धोबीपछाडही केला. परंतु आता राज्यात त्रास देऊ न का असे, उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संकेत उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.
राज्यातील जनता आघाडीच्या भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. त्यामुळे जनतेने महायुतीसाठी सत्तेचे पान वाढवून ठेवले आहे. शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन, अडवाणीजी, अटलजी यांच्या पुढाकारातून हिंदुत्वासाठी युती अस्तित्वात आली. आम्हाला सत्ता हवी आहे आणि युतीही हवी आहे. याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनाप्रमुखांना दहा वर्षे मतदान बंदी सहन करावी लागली. तरी पर्वा केली नाही. आता युती तुटली तर दु:ख होईल’, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.