Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पृथ्वीराज चव्हाणांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

पृथ्वीराज चव्हाणांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
मुंबई , गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (10:38 IST)
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरेंसह राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांबाबत भ्रष्टाचाराचा संशय निर्माण करणार्‍या माहितीचा अधिकार वापरून पृथ्वीराजांनी गेल्या दोन महिन्यांत भराभर हातावेगळ्या केलेल्या फायलींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने मागवली असून आरटीआयचे शस्त्र वापरून पृथ्वीराजांना जेरीस आणण्याचा विडाच उचलण्यात आला आहे. 
 
पावणेतीन वर्षांत प्रत्येक मंत्र्याची फाइल दहा वेळा तपासल्यानंतरही बाजूला ठेवणार्‍या पृथ्वीराज चव्हाणांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वेगाने फायलींवर सह्या करून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे पृथ्वीराजांनी दोन महिन्यांत भराभर मंजूर केलेल्या फायलींची चौकशी आम्ही करणार आहोत. माहितीचा अधिकार वापरून त्यातील सत्यता उघड करू, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
 
विधिमंडळाच्या कार्यक्रमात गणपतराव देशमुख व एकनाथ खडसे यांनी सिंचनाविषयी प्रश्न उपस्थित केले. यावर सिंचनात नक्की काय झाले, ते मी पाहीन असे सांगण्याऐवजी पृथ्वीराजांनी थेट सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करत संशयाचे वातावरण निर्माण केले. त्याची मोठी किंमत मला तसेच राष्ट्रवादी पक्षाला मोजावी लागली.
यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. 
 
माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीमार्फत चौकशी झाली. एटीआर रिपोर्ट आला. शेवटी यामधून निष्पन्न काहीच झाले नाही. कारण आम्ही चूक केलेलीच नव्हती. परंतु यामुळे आमची झालेली बदनामी भरून निघाली नाही. मात्र, पृथ्वीराजांचा राष्ट्रवादीविरोधात संशय बळकट करण्याचा हेतू सफल झाला, असे पवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi