पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. केंद्रात भाजपचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीत मात्र तशी परिस्थिती नाही. तरीही मोदींना प्रचारासाठी बोलावण्याची वेळ भाजपवर आली, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर प्रहार केला. शरद पवार तुळजापूर येथील जाहीर सभेत बोलत होते.
राज्यात नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत. मोदीही सर्व कामे सोडून प्रचाराला येत आहेत. त्यांनी पदाची प्रतिष्ठा जपावी, असा सल्ला पवारांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जीवन गोरे यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा झाली.
शरद पवार यांची सांगलीलाही जाहीर सभा झाली. भाजपने निवडणूक जाहिरातींतून महाराष्ट्राची बदनामी सुरू केली आहे. महाराष्ट्र हे गुंडांचे राज्य आहे, अशी प्रतिमा तयार करण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. परंतु महाराष्ट्राची बदनामी येथील जनता कदापी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठणकावले.