Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना-भाजपमधील भांडण हे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी : राणे

शिवसेना-भाजपमधील भांडण हे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी : राणे
मुंबई , सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (11:54 IST)
शिवसेना व भाजप यांचे जागावाटपासंबंधीचे भांडण मुख्यमंत्री कोणाचा यासाठी आहे. मात्र राज्याच्या या सर्वोच्च पदासाठी दोघाकडेही योग्य उमेदवार नसल्याची टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मीडिाशी बोलताना केली आहे. भाजप व शिवसेना नेत्यांमधील हे भांडण स्वार्थापोटी चालू आहे. त्यांना राज्याच्या हिताशी काहीही देणे-घेणे नाही, अशी टीका राणे यांनी केली आहे.
 
काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडू शकणारे अर्धा डझन नेते आहेत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत वाद सुरू आहे. पण तो लवकरच सामोपचाराने सोडविला जाईल. मुख्यमंत्रिपदासाठी दोन्ही पक्ष भांडत नाहीत; त्यांना राज्याच्या जनतेची हिताची काळजी असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी राष्ट्रवादीला 124 जागा देण्याची काँग्रेसने तयारी दर्शविली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांची मागणी केली आहे. 
  
त्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे घेतील तो निर्णय दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना मान्यच  करावा लागेल, असे राणे यांनी सांगितले आहे.
 
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी येत्या दोन दिवसामध्ये प्रसारित केली जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी राज्याच्या हिताच्यादृष्टीने चालू राहिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. लोकसभेच्या वेळेची मोदी लाट ओसरली असल्याचे नुकतेच काही राज्यामध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभांच पोटनिवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची निश्चित सरशी होईल असा ठाम विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
 
काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेले राणे यांनी आपण लवकरच सार्‍या राज्याचा झंझावाती दौरा करणार आहेत आणि महायुतीला निवडून देणे राजच्या हिताला कसे बाधक ठरेल हे आपण पटवून देणार आहोत, असे राणे यांनी नमूद केले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi