राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: महाराष्ट्रात येणार आहेत. मोदी अमेरिका दौर्यानंतर भारतात परतल्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेसाठी थेट कोल्हापुरात येणार आहेत. येत्या शनिवारी (4 ऑक्टोबर) रोजी सकाळी 10 वाजता येथील तपोवन मैदानावर त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे.
शिवसेना- भाजपची युती आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूर हे ठिकाण मध्यवर्ती आहे. कॉंग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधातील येथील जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तसेच इचलकरंजीच्या जागेवर विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजपचा मित्रपक्ष स्वाभिमानीनेही तीन जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मोदींच्या सभेचे ठिकाण कोल्हापुरात ठरविण्यात आले आहे.