पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त महाराष्ट्राबाबत केलेल्या विधानावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, गुजरातमधील बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? असा खोचक सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.
धुळे जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असे वक्तव्य केले आहे. तर स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजप ठाम असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपमध्ये मतप्रवाह निर्माण झाले आहे.
नरेंद्र मोदींचा इशारा हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याबाबत होता असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. छोटया राज्यांची भाजपची भूमिका कायम आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील जनतेने नेमका कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल निर्माण झाल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.