भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम खाडे- मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. प्रीतम यांच्या विरोधात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय मित्र आणि माजी मंत्री अशोक पाटील हे रिंगणात उतरले आहेत. मुंडेंच्या निधनाने बीड येथील जागा रिक्त झाली होती त्याजागी प्रीतम मुंडे-खाडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री सुरेश धस यांचा एक लाख 36 हजारांवर मतांनी पराभव केला होता. मुंडे यांनी संघर्षातून यशाचा मार्ग चोखाळताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याप्रमाणे जिल्ह्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले. यात माजी मंत्री अशोक पाटील यांचा अग्रभागी क्रमांक लागतो. परंतु मुंडे गेल्यानंतर आता तेच त्यांची कन्या डॉ. प्रीतम खाडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुक (२०१४) राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आणि काँग्रेसकडूनही राष्ट्रवादीला मदतीचेच फर्मान सुटले; परंतु त्याही वेळी पाटील दांपत्यांकडून मुंडेंसाठी मदतीचा हात पुढे झाला. मात्र मुंडेंच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी संपुष्टात येताच अशोक पाटील रिंगणात उतरले आणि सगळ्यांच्याच भुवया एकदम उंचावल्या.