शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिलेला अंतिम प्रस्तावही भाजपने फेटाळला. युती टिकावी ही आमचीही इच्छा आहे. परंतु माध्यमांतून जागा वाटपाचे प्रस्ताव देणे योग्य नाही. चर्चेतून मार्ग काढायला हवा, अशी आमची इच्छा असल्याचे भाजपचे नेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी दिले आहे.
मुंबईत रविवारी शिवसेनाचा मेळावा झाल्यानंतर भाजप नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेकडे भाजपने 130 जागांची मागणी केली आहे, त्यावर आजही ठाम आहोत. शिवसेनेने 140 जागा लढवाव्यात उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना द्याव्यात, असा आमचा प्रस्ताव असल्याचे तावडे म्हणाले.
युती झाली तेव्हा लोकसभेच्या 32 भाजपकडे तर 16 जागा शिवसेनेकडे होत्या. मात्र आम्ही शिवसेनेला सहा जागा वाढवून दिल्या. तसेच प्रकाश जावडेकरांची राज्यसभेची जागाही रिपाइंला दिली. मात्र या बदल्यात शिवसेनेने आम्हाला विधानसभेची एकही जागा वाढवून दिली नसल्याचे खडसेंनी सांगितले. आता राजकीय परिस्थिती बदलल्याने जादा जागा मिळाव्यात, अशीच आमची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका होत असेल तर ती सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दात खडसे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.
युती झाल्यापासून राज्यातील 59 मतदारसंघात शिवसेना व 19 मतदारसंघात भाजप कधीच विजय मिळवू शकलेला नाही. या जागांच्या अदलाबदलीचा विचार व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे, या मागणीचा पुनरुच्चार खडसे व तावडेंनी यावेळी केला.