Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतदान झाले, आता निकालाकडे सगळ्यांचे लक्ष

मतदान झाले, आता निकालाकडे सगळ्यांचे लक्ष
मुंबई , गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (11:11 IST)
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. राज्यात सरासरी 62 टक्के मतदान झाल्याचा अंदाज शासकीय सूत्रांन‍ी वर्तवला आहे. 
 
राज्यातील मतदारांनी उतस्फूर्तपणे मतदान करून 4,119 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले.  सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला.11 वाजेनंतर मतदानाला प्रतिसाद वाढत गेला. गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांमध्ये दुपारी तीनपर्यंत मतदान पार पाडले. या भागात सुमारे पहिल्यांदा 44 टक्के मतदान झाल्याचे समजते. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी एका मतदान केंद्रावर गोळीबार केला. 
 
दरम्यान, मतदानाला सकाळी सुरुवात होताच विदर्भातील रामटेक जिल्ह्यातील सावनेरमधील एका मतदान केंद्रावर वीज कोसळून एक पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे मतदान प्रक्रियेत अनेकदा अडचणीही आल्या. मतदानावर या पावसाचा प्रचंड परिणाम झाला.
 
दुसरीकडे, नागपूरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडले होते.तसेच नाशिकमधील मनपा शाळेतील एक मतदान यंत्रही बंद पडल्याची माहिती मिळाली होती. मुंबईतील शिवडी येथेही बीडीडी चाळीतील बूथवर मतदान यंत्र बंद पडले आहे. 
 
सातारा येथील पाटण तालुक्यातील भुरकेवाडी येथे एका कार्यकर्त्याने मतदार यादीत नाव नसल्याने व्होटींग मशिन जमिनीवर आदळून फोडले. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.
 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला. तसेच अभिनेता अभिषेक बच्चन, जया बच्चन, अभिनेत्री रेखा, मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकर, अंजली तेंडूलकर, शाहरुख खान, रणबीर कपूर, सलमान खान, आमीर खानची  पत्नी किरण राव, किरण खेर, अनुपम खेर आणि मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने मतदानाचा हक्क बजावला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi