राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. दरम्यान, आघाडी सरकार अल्पमतात आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. मात्र, राज्यात तशी कोणतीही स्थिती नसल्याने राज्यपाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहण्यास सांगतील, अशी शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने काल काँग्रेससोबत काडीमोड घेताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार यांनी लगेचच राज्यपाल राव यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्रही दिले आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनीही मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचे सरकार अल्पमतात आले आहे.
सरकार अल्पमतात आल्याने सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन केली. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यपाल राव यांची भेट घेऊन राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीची माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने व नवे सरकार महिन्याभराच्या आत स्थापन होण्याची शक्यता असल्याने राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याची शक्यता कमी आहे. राज्यात आणीबाणीची व गुंतागुंतीची स्थिती असेल तर राष्ट्रपतीच्या आदेशाने तसे करता येते.