काही माणसं फक्त विशिष्ट कामांसाठीच जन्माला येतात असे म्हटले जाते. विजय तेंडुलकर हे त्यापैकीच एक. कारण तेंडुलकरांचा जन्मच मुळी लेखनासाठी झाला होता. सिनेमा, नाटकं, कथा, पटकथा, अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या लेखणीने मुशाफिरी केली आणि स्वतःचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे मराठीत लिहिले तरी त्यांचे साहित्य ग्लोबल झाले. त्यांचा मोठेपणा सांगायला ही एक बाब पुरेशी आहे. तेंडुलकरांचा जन्म 6 जानेवारी 1928 साली सारस्वत ब्राह्मण कुटुंबात कोल्हापुरात झाला. त्यांचे वडिल कारकून होते. शिवाय प्रकाशनाचा छोटासा व्यवसायही ते चालवायचे. ज्या काळात मुलांना खेळण्याशिवाय इतर काही सुचत नसते अशा वयात अर्थात वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. घरात विखुरलेली पुस्तके हे त्यांच्या लेखनाचे मूळ ठरले. |
तेंडुलकरांच्या लिखाणात एक जिवंतपणा होता. त्यांच्या प्रत्येक नाटकातून समाजातील एका विशिष्ट प्रथेवर प्रहार तर असायचे परंतु, त्यांच्या नाटकातून एक सामाजिक संदेशही असायचा. |
|
|
बालवयात त्यांच्या लेखनाचे भरपूर कौतुक झाले. घरातील संस्कारांचाही त्यांच्या लेखनावर सुरुवातीच्या काळात बराचसा परिणाम झाल्याचे दिसून येते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणावरही पाणी सोडले. या दरम्यान काही काळ त्यांच्या लिखाणात व्यत्यय निर्माण झाला. परंतु त्यानंतर त्यांनी जोमाने लेखन सुरू केले. हे सारेच लिखाण प्रसिद्ध झालेच असे नाही. परंतु त्यांनी लेखन मुळीच सोडले नाही.
तेंडुलकरांनी आपल्या लेखनाला वर्तमानपत्रांमधून सुरुवात केली. मग त्यांच्या नावाची ओळख होऊ लागली. 'आमच्यावर कोण प्रेम करणार' हे त्यांचे नाटक त्या काळात प्रचंड गाजले. यानंतर त्यांच्या लेखनाला खर्या अर्थाने प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. या नाटकांनंतर त्यांचे 'गृहस्थ' हे नाटकही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले होते.
'श्रीमंत' या नाटकाने त्यांना लेखकांच्या यादीत वर नेऊन ठेवले. यानंतरच्या काळात मुंबईत आल्यानंतर तेंडुलकरांनी मराठी रंगभूमीला नवीन दृष्टिकोन दिला. त्यांच्या नाटकांनी मराठी नाटकातील पात्रे अजरामर केली. नाटकातील कलाकारांनाही सामान्य जनता पात्राच्या नावाने ओळखू लागली हे विशेष.
तेंडुलकरांच्या लिखाणात एक जिवंतपणा होता. त्यांच्या प्रत्येक नाटकातून समाजातील एका विशिष्ट प्रथेवर प्रहार तर असायचे परंतु, त्यांच्या नाटकातून एक सामाजिक संदेशही असायचा. म्हणून तर 'गिधाडे', 'घाशीराम कोतवाल', 'श्रीमंत', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर' या नाटकांनी मराठी रंगभूमीवरच नव्हे तर समाजात वादळ निर्माण केले.
ही नाटकं केवळ गाजलीच नाहीत तर त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही झाले. भाषांची कुंपणेही ओलांडून तेंडुलकर विविध भाषांत पोहोचले. त्यांच्या लिखाणाने आणि विषय मांडण्याच्या पद्धतीने ते वादाच्या भोवर्यात अनेकदा सापडलेही, पण 'एकला चलो' म्हणत, 'तें' त्यांना जे वाटते ते लिहित राहिले.
नाटकांच्या बरोबरीने तेंडुलकरांनी चित्रपटांच्या पटकथा आणि कथाही लिहिल्या. त्याकाळात त्यांच्या इतका मराठी कथाकार नव्हता हे त्यांना मिळालेल्या फिल्मफेअर आणि इतर पुरस्कारांवरूनच स्पष्ट होते.
1990 साली त्यांनी 'स्वयंसिद्धा' नावाचे एक मराठी मालिका लिहिली, या मालिकेत त्यांची मुलगी प्रिया तेंडुलकर यांनी प्रमुख भूमिका केली होती आणि ही मालिकाही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली.
पण म्हणतात ना काळापुढे कोणाचेही चालत नाही. तेंडुलकर कुटुंबीयांना दुर्देवी काळाचा मोठा फटका बसला. 2001 मध्ये त्यांचा मुलगा राजीव आणि 2002 मध्ये मुलगी प्रिया तेंडुलकर यांनीही त्यांची साथ सोडली. आणि अखेर आज तेंडुलकरांनाही काळाने हेरावून घेतले.
त्यांचे जाणे अनपेक्षित असले, तरी त्यांनी मराठी रंगभूमीतील उगवत्या नाट्यकर्मींना एक मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे स्वतंत्र दृषिकोन ठेवून लिखाण करण्याची आणि आपल्याला वाटेल तेच आणि तसंच लिहिण्याची. प्रसंगी त्यासाठी दगडं खायची वेळ आली तरीही चालेल.