आषाढी वारी ही एक मोठी वारी आहे. यावेळी संत लोक, श्री ज्ञानेश्वर माउली आळंदीहून चालत चालत दशमीपर्यंत पंढरीत येत व आपल्या लाडक्या स्वामीला, आपल्या भगवंताला भेटत. भगवंत विठूमाउली सुद्धा आपल्या लाडक्या भक्तांची आतुरतेने वाट पाहात असतात. तो दिवस म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी. या आषाढी वारीत अनेक लहान मोठय़ा संतांची मंडळे ज्ञानोबा माउलीबरोबर चालत, वाजत, गाजत, भजन, कीर्तन, भारूड करत ऊन-वारा-पाऊस अंगावर फुले झेलल्यासारखी झेलत पंढरीला येतात.
बहुत सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलु आवडी । असे त्यांना वाटत असते. घरदार, संसार, सुख-दु:ख, दुखणे, आजारपण सर्व विसरून या वारीत सामील होतात. हजारो संख्येने नव्हे लाखो संख्येने हे वारकरी कोणाच्याही पत्राची, आमंत्रणाची वाट न पाहता सर्व कामे बाजूला ठेवून किंवा पूर्ण करून वारीला निघण्यास तयार असतात. कशाचीही काळजी, चिंता न बाळगता सर्व त्या माउलीवर सोपवून आषाढ महिन्यात तयार होऊन निघतात. कोणी एक दिवस प्रस्थानाला येतात. कोणी चार दिवस तर कोणी संपूर्ण दिवस म्हणजेच ज्ञानदेवांच्या प्रस्थानापासून पंढरीपर्यंत चालत सतत त्या माउलीचे नाव घेत भजन, कीर्तन करत वारीत सामील होतात. सर्वांच्या मनात एकच भावना असते ती म्हणजे आपली ज्ञानेश्वर माउली आपल्या या पायी वारीत आपल्याबरोबर आहे. त्यामुळे तो वारकरी अगदी निर्धास्त असतो. चालल्यामुळे पाय दुखणे, आजारी पडणे हे सर्व तो विसरतो. ह्या विश्वासामुळे तो एकदम निर्धास्त असतो. त्याला भीती कशाचीही राहात नाही. आपले जेवणखाणे, नाष्टा या सर्वांची काळजी माउली करतात. काही वेळा ते आपल्या भक्तांची परीक्षा घेतात व त्यांना चांगल्या मार्काने पासही करतात. यासाठी आपला फक्त दृढ विश्वास पाहिजे. आणि तो दृढ विश्वासपण आपले सद्गुरुच देतात.
आपण घरी देखील रोज गोड, मिष्ट अन्न खात नाही आणि खाल्ले तर डॉक्टरांना आमंत्रण आहेच. पण या संतांच्या वारीत रोज मिष्ट अन्न खाऊन आपणाला कसलाही त्रास होत नाही. जर झालाच तर तात्पुरता झाल्यासारखेच. अगदी मोकळ हवेतून चालत, घाटातून चालत, मोकळ रानातून, दाट झाडीतून, मजल दरमजल करत आपण चालत असतो. निसर्गाचा पुरेपूर आनंद आपण वारीत सतत घेतो. नवीन माणसे, नवीन ओळखी, नव कला अनुभवाला मिळतात. आपल्या संपूर्ण शरीराची या वारीमुळे सर्व्हिसिंग होते. हे सर्व मी अनुभवावरून लिहीत आहे.
वारीमध्ये आपल्या बरोबरीच्या सवंगडय़ांच बरोबर आपुलकीचे भाव निर्माण होतात. कारण आपण सतत आपल्या सदगुरूबरोबर चालत असतो. त्यांनी आपले हात त्यांच्या हातात घेतलेले असतात.
आपण सतत त्या भगवंताचे नाम घेत भजन करत चालत, नाचत राहिलो तर कसलेही दुखणे आपणास स्पर्शही करत नाही. माझाच अनुभव असा की आपण जर वारी सोडून पुढे किंवा मागे राहून घरगुती गप्पा मारत चाललो तर त्रास झाल्यासारखे वाटते. म्हणून नाम घेत भजन करीत चालले तर ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटवाची’ हा अनुभव मिळतो.
वारीत घडणार्या संत संगतीमुळे, त्यांच्या अभंगामुळे संत विचारांचे अनुकरण वारकरी जीवनात करीत असतात. तुम्हाला माळ असो किंवा नसो वारीत माणसे तुमच पाया पडतात. तुम्हाला माउली म्हणतात. तुमच्या वयाचा विचार करत नाहीत. हा सर्व संतांच्या संगतीचा परिणाम आहे. संत संगतीमुळे आपले जीवन घडते, वारीत कोणीही दु:खी कष्टी दिसणार नाही. वारीत वारकरी कसलही गैरसोयीची तमा बाळगणार नाहीत. कारण त्याचा तो नसतो, तो सर्वस्वी तया माउलीचा होऊन जातो.
आता या आपल्या वारीत परदेशी पर्यटक देखील येतात आणि हा अनुभव, हे सुख लुटतात. त्याचा आनंद घेतात.
या सर्वातून सांगायचे हे एकच, आपल्या या भारतीय तरुणांनीही या आषाढी वारीचा आनंद घ्यावा, ही आनंदाची वारी एकदातरी अनुभवावी. आज आधुनिक काळात अनेक प्रकारचे समस्यांचे, अडचणींचे, दु:खाचे डोंगर वाढले आहेत.
आपण जर या वारीत सामील झाला तर त्या विठूरायाची, परब्रह्मची भक्ती आपल्याला या समस्यांच्या जाळ्यातून मुक्त करेल, त्यांच्या चिंता मिटतील, असे स्वानुभवावरून अनेकांनी सांगितले आहे. मीही अनुभवतो आहे.
दिलीप कुलकर्णी