झिम्मा-फुगड्या खेळ रंगले... तुकोबा पंढरीला निघाले
टाळ, मृदंग, वीणा, सनई चौघडा तुतारीचा निनाद, तुकाराम-तुकाराम नामाचे अखंड नामस्मरण करीत व मनात पांडुरंगाला भेटण्याच्या ओढीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवारी दुपारी अडीच वाजता आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले. समाजातील सर्वच घटकांवर मौलिक व चिरंतन संस्कार घडविणार्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ३२६ वे वर्ष आहे. आज पहाटे मंगलमय वातावरणात मंदिरातील पूजेला काकड आरतीने प्रारंभ झाला. पहाटे साडेचार वाजता देऊळवाड्यातील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा पालखी सोहळा .प्रमुख संजय महाराज मोरे, विश्वस्त राजेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महापूजा संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख पंढरीनाथ मोरे व विश्वजित मोरे यांच्या हस्ते झाली. आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह त्यांच्या पत्नी व आशा बुचके, नीतीन महाराज मोरे आणि यांच्यासह अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता पालखी सोहळ्यास संभाजी महाराज मोरे (देहूकर) यांच्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाने सुरुवात झाली. त्यानंतर परंपरेप्रमाणे गावातील घोडेकर सरफांनी महाराजांच्या पादुकांना चकाकी देण्याचे काम केले. या पादुका नंतर इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. या पादुकांची परंपरागत पद्धतीने विधिवत पूजा दिलीप महाराज गोसावी यांनी केली. त्यानंतर या पादुका पालखीचे मानकरी मसलेकर कुटुंबातील किसन ज्ञानोबा सोळंकी व उत्तमराव सोळंकी यांच्याकडे देण्यात आल्या. त्यांनी या पादुका डोक्यावर घेऊन टाळ-मृदंग आणि तुतारीच्या गजरात मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या.