Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वारकरी पंढरीचा, धन्य जन्म त्याचा

वारकरी पंढरीचा, धन्य जन्म त्याचा

वेबदुनिया

। अभंगवारी ।
भागवतधर्माला तत्त्वज्ञानाचा बळकट खांब एकनाथ महाराज यांनी दिला. उध्दवाला कृष्णाने केलेला उपदेश ‘भक्ती निरुपिली’ अशा स्वरूपाचा असून त्यांनी तो भागवताच्या एकादशस्कंदावर भाष्य करून जो प्रसिध्द केला त्याला ‘नाथभागवत’ असे म्हणून ओळखिले जाते. त्यांनी विपुल अभंगही लिहिले आहेत. त्यात पंढरीचा आणि आषाढीवारीचा महिमा सांगताना ते म्हणतात की, पुंडलिकाने वैकुंठीचा देव पंढरीत आणून उभा केला, त्यामुळेच तो सर्वाना दर्शनार्थ तुम्हा-आम्हा सर्वाना उपलब्ध झाला. त्याच्या दर्शनसुखाचा लाभ केवढा म्हणून सांगावा? तर तो इतरांना ज्ञाग केल्याशिवाय प्राप्त होत नाही, पण पंढरीची वारी करणार्‍या भोळ्या भाविकांना भीमातटी अगदी सहजपणे दर्शन देऊन त्यांचे जीवन धन्य करतो. हीनदीन वा आगदी पाप करणार्‍या कुणालाही तो दर्शनाने मोक्ष देतो. का? तर दर्शनानेच त्याची मूळ दशा वा प्रवृत्ती पालटते आणि तो भक्तिमार्गी होतो. त्यामुळे तो पापमुक्त होतो आणि विठ्ठलनामाच्या स्मरणाने तसेच वारीधर्माचे अनुसरण केल्याने त्याला मोक्षप्राप्ती मिळते.

नाथमहाराज म्हणतात की, 
‘वारकरी पंढरीचा। धन्य धन्य जन्म त्याचा ।।1।।

जाय नेमे पंढरीसी । चुको नेदी तो वारीसी ।।2।।

आषाढीसी कार्तकी । सदा नाम गो मुखी ।।3।।

एका जनार्दनी करी वारी ।

धन्य तोचि बा संसारी ।।4।।’

जीवन धन्यतेची कारणेही त्यांनी आणखी सांगितली आहेत. कोणती म्हणाल? तर न चुकता पंढरीची वारी करणारा वारकरी तर धन्य होतोच. मुखीनाम आणि वाटचाल सन्मार्गाची हीच जर त्याची आचारप्रणाली असेल, तर त्यातून प्राप्त होणारे सुख-समाधान आणि शांती हीच तर त्याचे जीवन धन्य करते. शिवा दुसरे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे देव नि भक्त या वारीच्या निमित्त एकत्र येतात. भक्त भक्तिमध्ये काहीजण संतही असतात. त्यांची सत्संगती तिथे समूहरूपाने प्राप्त झाल्याने विठ्ठलनामाचे विस्मरण होत नाही. तसेच तिथे सुरू असणार्‍या भजन-कीर्तनातून भक्तिभाव उचंबळून येतो. तो मनावर ठसतो.‘भक्त येती लोटांगणी। दैव पुरवी मनोरथ मनी’ त्यामुळेच भक्त त्याचेपायी मिठी घालतो. त्यांनी म्हणूनच-

‘माझे माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ।।1।।

संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ।।2।।

टाळ घोष पताका । नाचतात वैष्णव देखा ।।3।।

विठ्ठलनामे गर्जती । प्रेम भरीतनाचती ।।4।।

एका जनार्दनी शरण । विठ्ठलनामे लाधे पूर्ण ।।5।।

हा ‘कृपालाभ’ महत्त्वाचा.

प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विठोबाशी निगडित कथा