Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्येचे माहेरघर माउलीमय

विद्येचे माहेरघर माउलीमय
पुणे , सोमवार, 23 जून 2014 (11:23 IST)
ज्ञानोबा- तुकारामांचा गजर करीत ठिकठिकाणी अन्नदान करून पुण्यनगरीत माउलींच्या पालखीचे स्वागत जोरदार स्वागत करण्यात आले. वारकर्‍यांच्या खांद्यावरील भगव्या पताका आणि टाळमृदंगाच्या गजराने विद्येच्या माहेरघर म्हणून ओळखली जाणारी अवघी पुण्यनगरी माउलीमय झाली.
 
ज्ञानेश्वर- माउलींच्या गजरात पुण्यनगरीने भाविक व पालख्यांचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम या दोन संतांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी अवघा जनसागर उसळला होता. दोन संतांच्या पालख्यामधील लाखो वारकर्‍यांच्या अलोट गर्दीने जणूकाही संतांचा मेळाच भरल्याचे चित्र पुण्यात होते. शहरात ठिकठिकाणी अभंग फुगडी, खेळ आणि अखंड हरिनामाचा गजर अशा भावपूर्ण वातावरणात आसमंत फूलून गेला होता. अबालवृद्ध, तरूण सर्वजण माउलींच्या दर्शनासाठी नानापेठेचा पालखी विठोबा मंदिरात रस्त्यावर आले होते.
 
पालखीच्या दर्शनासाठी महिला व पुरूष अशा स्वतंत्र रांगा होत्या. लाखो वारकर्‍यांच्या गर्दीने संपूर्ण शहर ज्ञानोबा- तुकारामाचा गजर करत होते. संपूर्ण पुण्यात ठिकठिकाणी भजन, कीर्तन, अखंड चालणारी अंभगवाणी आणि दर्शनासाठीच्या रांगा यामुळे आज जणू काही भक्तिसागरच उसळला होता. दरम्यान,  पहाटे माउलींच्या पादुकांची पूजा पालखी सोहळा प्रमुख डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी केली. त्यानंतर दर्शन चालू करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविक पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली.
 
आज दिवसभर स्वच्छ वातावरण होते. आकाशात अधूनमधून ढग जमा होत होते. परंतु कोठेही पावसाचा मागमोस जाणवत नव्हता. वारकर्‍यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरते दवाखाने उपलब्ध केले होते. चहा अल्पोपोहराची सोय, वारकर्‍यांसाठी शहवासीय, विविध मंडळे, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी अन्नदान, मोफत आरोग्य शिबिरे भरवून पुण्य पदरात पाडून घेतले. सोमवारी सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाट पार करून संत सोपानकाकांच्या सासवड ग्रामी 2 दिवसांच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi