Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ashadhi Ekadashi 2020 : उपवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Ashadhi Ekadashi 2020 : उपवास करण्यापूर्वी नक्की वाचा
, सोमवार, 29 जून 2020 (19:48 IST)
भारतात उपवास करण्याची प्रथा अत्यंत जुनी आणि महत्त्वाची आहे. परंतू उपवास या शब्दाचा खरा अर्थ लोकं विसरत चालले आहेत. उपवास याचा शाब्दिक अर्थ बघायला गेलो तरी उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. अर्थात जवळ राहणे. अर्थातच देवासाठी केला जाणार्‍या उपवास याचा अर्थ आहे देवाच्या जवळ राहणे.
 
आजच्या परिस्थितीत याचा अनर्थ झाला असून उपवासाच्या नावाखाली वाटेल ते पदार्थ पोटात ढकले जातात. किंवा एक वेळ जेवण्याची पद्धत असल्यास त्या एक वेळ दोन-तीन वेळाची भर काढणे अगदी सामान्य आहे.
 
खरं तर उपवासाची उत्पत्ती एखाद्या ठराविक दिवशी मानसिक रूपाने देवाला नमन करण्याची अर्थातच देवाच्या जवळ राहण्यासाठी या हिशोबाने करण्यात आली असावी. खूप काळापूर्वी एकादशी, शिवरात्री, पौर्णिमा अशा दिवशी आपल्या दररोजच्या कामातून विश्रांती घेऊन देवासाठी काही काळ काढावा अशी योजना असावी. जसे शेतकरी, व्यापारी दररोजच्या धावपळीत देवाला आभार मानण्यासाठी वेळ नसल्यामुळे तसंच एखादा दिवस कुटुंबासह वेळ घालवायचा या विचारासह उपवास करणे सुरू केले गेले असावे. तेव्हा उपवास म्हणजे उपाशी राहून देवाचे नाव जपत राहावे अशी कल्पना नसेल तरी पुरुष मंडळी घरात असताना बायकांना स्वयंपाकघरापासून मुक्ती मिळणार तशी कशी म्हणून सर्वांनी उपाशी राहून देवाची आराधना करावी असा ठराव झाला असावा.
 
नंतर यामुळे शरीराला एक दिवस आराम मिळाल्याने शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडून जाता. अर्थात हे लाभदायकच आहे. अशात तेव्हा उपवास म्हणजे न शिजवलेले पदार्थ ग्रहण करणे असा होता. त्यात पाणी, दूध, फळं यांचा समावेश होता. एकूण हा दिवस कामांमध्ये व्यर्थ न घालवता, न शिजवता खाऊ शकणारे पदार्थ ग्रहण करून, देवाची भक्ती करायची असा होता. त्यात मनोरंजनाला देखील स्थान नव्हते.
 
पण आजच्या परिस्थितीत पोट भर तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाल्ल्यावर उपवास करणार्‍याला भक्ती करताना झोप येणे तर निश्चित आहे. म्हणून खर्‍या अर्थाने उपवास म्हणजे सात्त्विक पदार्थ खाऊन देवाची भक्ती करणे. त्या काळच्या मनोरंजनाचे साधन वेगळे आणि आताचे वेगळे म्हणजे आजच्या तारखेला उपवास करायचा म्हणजे भक्ती, ध्यान करताना हातात मोबाईल नसावा तर तो खरा उपवास धरायला हवा. मोबाइल, टीव्हीपासून लांब राहून देवाची भक्ती केल्यास उपवास नाही तर हल्ली बाजारात उपलब्ध शेकडो प्रकाराचे पदार्थ खाऊन उपवास करणे स्वत:ला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. उलट हे पदार्थ इतर दिवसात खाल्ल्या जाणार्‍या पौष्टिक पदार्थांपेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतात.
 
म्हणून मनोभावे उपवास करून देवाची भक्ती करायची इच्छा असेल तर हे नियम पाळावे:
 
उपवासाच्या एका दिवस आधीपासून गरिष्ठ भोजनाचा त्याग करावा.
 
उपवासाचा दिवस सोप्या पद्धतीने घालवावा.
 
उपवासाच्या दिवशी ध्यान करावं.
 
या दिवशी चुकून क्रोध करणे, चुगली करणे, दुसर्‍यांचे मन दुखवणे टाळावे कारण मन शुद्ध नसल्यास भक्ती होणार तरी कशी.
 
उपवासाला फळं -दूध घेणे उत्तम ठरेल. फलाहार उत्तम आहार आहे. फळांचा आहारात समावेश ठेवल्यास भूक भागते आणि शरीरातील ऊर्जाही टिकून राहण्यास मदत होते.
 
उपवासाच्या दिवशी अधिक प्रमाणात पाणी प्यावं.
 
कमजोरी जाणवत असल्यास लिंबू- पाणी पिणे योग्य ठरेल. ताक, दूध, शहाळं पाणी, यांसारख्या पेयांचा वापर केल्यास ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
 
मधुमेही लोकांनी उपाशी राहणे टाळावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आषाढी एकादशीची पुराणातील कथा