Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेजुरीच्या सोमवती यात्रेला दोन लाख भाविकांची हजेरी

जेजुरीच्या सोमवती यात्रेला दोन लाख भाविकांची हजेरी

वेबदुनिया

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावास्या यात्रेसाठी सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.

WD


रविवारी सकाळी 10.18 वाजता अमावास्येला प्रारंभ झाला, सोमवारी दुपारी 12.43 पर्यंत कालावधी असल्याने भाविकांनी
मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी 7 वाजता पारंपरिक पध्दतीने पेशवे इनामदारांनी पालखी उचलण्याची सूचना केली. यावेळी शेडा देण्यात आल्यावर खांदेकरी मानकरी यांनी पालखी खांद्यावर उचलून घेतली. खंडोबा-म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्ती घेऊन पालखी कर्‍हा नदीकडे जाण्यासाठी निघाली. गडामध्ये पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी पालखीला खांदा लावण्यासाठी शेकडो भाविक प्रयत्न करताना दिसत होते. यावेळी गडावर खंडोबा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, विश्वस्त ड. वसंत नाझीरकर, संदीप घोणे हे उपस्थित होते. पावसाची झालेली उघडीप, शेतकर्‍यांच्या उरकलेल्या पेरण्या यामुळे राज्यातील विविध भागातील शेतकरी बांधवही मोठय़ा संख्येने आले होते. यात प्रामुख्याने नाशिक, नगर, मुंबई, ठाणे, पुणे आदी भागातील भाविकांचा समावेश होता.

दिंडी दरवाजाजवळ पालखी आली असता भाविकांनी सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत पिवळ्याधमक भंडार्‍याची मुक्त उधळण केली. पालखी होळकरांच्या छत्री मंदिराला भेटून कर्‍हा स्नानासाठी मार्गस्थ झाली. वाटेत अनेक ठिकाणी रांगोळ्या घालून देवाचे स्वागत करण्यात आले. सकाळी 11 वाजता कर्‍हेच्या पात्रात देवांच्या मूर्तीना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात आले. नंतर मानकर्‍यांकडून मूर्ती पुन्हा पालखीत ठेवल्यावर पालखी खंडोबा गडाकडे जाण्यास निघाली. सायंकाळी पालखी खंडोबा गडावर पोहचल्यावर रोजमोरा (धान्य) वाटण्यात आले.

यंदा भंडार खोबर्‍याचा भाव 120 ते 150 रुपये किलो होता. दिवटी, बुधली, देवांचे फोटो व व्ही.सी.डी, पेढे, रेवडी, चुरमुरे आदी वस्तूंना उठाव असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi