Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र

पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र
भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. या पंढरीच्या दरबारात नेमके काय आहे याचा वेध तर घेऊया. 

विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात आहे.

आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.

जवळच्याच दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. पुढे चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमान' नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता, असे सांगितले जाते. तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. वास्तविक विठोबा हा शैव आणि वैष्णव या दोन्हींचा समन्वय साधणारा असूनही असा प्रकार घडला.


webdunia
MH GOVT
येथील सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेश-मंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेल्या ओवरीत नारद व कोप-यात रामेश्वर यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. सभामंडपाच्या पाय-या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळ्खांबी मंडपात आले. म्हणजे एका भिंतीत 'शिलालेख' असून त्यावर देवी आहे. हा शिलालेख गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.

विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात.

पंढपूरातील इतर भक्तीस्थाने

पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.2 किलोमीटरवर विष्णूपद-वेणूनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस गोपाळपूर येथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळे आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रूक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेव मंदिर, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, शांकभरी, (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारूती, मुरलीधर, गारेचा महादेव, काळा मारूती, चोफाळा (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त , बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरूजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.

(संदर्भः विश्वकोश)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुकोबा पालखीचे पुण्यात भव्य स्वागत