Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंढरपूरात दाखल झाले अडीच लाख भाविक

पंढरपूरात दाखल झाले अडीच लाख भाविक
पंढरपूर , मंगळवार, 8 जुलै 2014 (16:04 IST)
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. सावळ्या विठूरायाच्या ओढीने आणि आषाढीयात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यातून अडीच लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीत जणू भक्तीचा महापूर ओसंडून वाहतो आहे. मागील आषाढीयात्रेच्या विक्रमी गर्दी झालेली होती. मात्र, यंदा पाऊस  कमी असल्याने भाविकांच्या संख्या घटली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण काशी असलेल्या या पुण्यनगरीमध्ये सर्वत्र टाळ-मृदंगाचा गजर तसेच हरिनामाचा जयघोष ऐकू येत असल्यामुळे सारी पंढरीनगरी भक्तिमय झाली आहे. यात्रेसाठी गेल्या वर्षी ज्याप्रमाणे विक्रमी गर्दी झाली होती त्याप्रमाणेच या वर्षी देखील गर्दी होईल, अशी शक्यता गृहीत धरून प्रशासनाने यात्रेची तयार केली आहे.

आषाढी एकादशीला (9 जुलै) श्री विठ्ठलरुख्माईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

माऊली आणि तुकारामांची पालखी आज सायंकाळी पंढरीनगरीत- आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पंढरीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपले आहेत. येथे अगोदरच दाखल झालेल्या विविध संतांच्या लहान-मोठय़ा पालख्या तसेच दिंड्या दशमीच्या दिवशी पंढरीच्या सीमेवर वाखरी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज तसेच श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे स्वागतासाठी जात असतात. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत रेल्वे, एस.टी गाड्या तसेच खासगी वाहनांद्वारे सुमारे अडीच ते तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झालेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi