संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे आगमन मंगळवारी पंढरपूर तालुक्यात झाले. तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले असून टप्पा येथे माउली व सोपानकाका यांच्या पालखींची बंधूभेट झाली. दरम्यान, काल अष्टमी दिवशी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने लखीसमत असणारी वाहने धिम्या गतीने पुढे सरकत होती.
यंदा आषाढी यात्रा सुरू झाल्यापासूनच्या पर्जन्यराजाने जिल्हय़ात चांगलीच हजेरी लावली आहे. पायी चालत येणार्या पालखी सोहळतील भाविक व वाहनांची या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी दीड ते सव्वा दोनच्या सुमारास मोठा पाऊस पालखी मार्गावर झाला. यामुळे वाहने रस्तच्या खाली उतरत नव्हती. ज्यामुळे पालखी सोहळे हळूहळू पुढे सरकत होते.
वेळापूरचा मुक्काम आटोपून आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुढे निघाला व वाटेत ठाकूरबुवांच्या समाधीजवळ रिंगण सोहळा होऊन पालखीने दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर तालुक्यात टप्पा (पिराची कुरोली) येथे प्रवेश केला. पालख्यांचे स्वागत परंपरागत तोफ्यांच्या सलामीने करण्यात आले. पालखी सोहळ्याचे स्वागत तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी ईशाधिन शेळकंदे तसेच सहकारशिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कलणराव काळे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली सातपुते उपस्थित होत्या.
दुपारी पावणेचार वाजता सासवडहून निघालेली संत सोपानदेवांची पालखी टप्पा येथे आली व येथे संत ज्ञानेश्वर व सोपानकाकांची बंधूभेट झाली. या दोन्ही पालख्या एकमेकांजवळ आणल्या जातात व दोन्ही सोहळाप्रमुख एकमेकांना श्रीफळ देऊन भेट घडवितात. माउलींच्या पालखी सोहळच्यावतीने डॉ. प्रशांत सरू यांनी तर सोपानकाका पालखी सोहळ्याच्यावतीने गोपाळराव गोसावी यांनी श्रीफळ दिले. बंधूभेटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला यावेळी पालख्यांच्या दर्शनासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
दुपारी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करता झाला. मळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील मुक्काम आटोपून हा सोहळा तोंडले बोंडले येथून पिराची कुरोली येथे मुक्कामी आला आहे. तोफ्यांच्या सलामीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरूंच्या पालखी सोहळसाठी पिराची कुरोली येथील पालखी तळावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दोन्ही मोठ्या पालख्या एकाच मार्गावर आल्या असून भाविकांनी पालखी मार्ग भरून गेला होता. हजारो वाहने व लाखो भाविक एकाच रस्त्यावरून पुढे सरकत आहेत. यातच अनेक लहान मोठ्या पालख्या देखील याच मार्गावरून पंढरपूरकडे येत आहेत.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर व संत सोपानकाकांचा पालखी सोहळा टप्पा येथून भंडीशेगावकडे मार्गस्थ झाला. या दोन्ही पालख्या भंडीशेगाव मुक्कामी असणार आहेत. आज सर्व पालख्या वाखरीत असणार आहेत.