Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री संत ज्ञानोबा माउलींच पालखीजेजुरीत

श्री संत ज्ञानोबा माउलींच पालखीजेजुरीत
जेजुरी , गुरूवार, 26 जून 2014 (11:26 IST)
वारी हो वारी ।

देई का गां मल्हारी ।।

त्रिपूरारी हरी ।

तुझ्या वारीचा मी भिकारी ।।

सोपानदेवांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन जेजुरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन होताच जेजुरीवासियांनी बेल भंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत माउलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले.

पहाटे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने माउलींच्या पादुकांची विधिवत पूजा करून हा सोहळा सकाळी जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा 8.45 वाजता बोरावके मळा येथे पोहोचला. येथे वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी घेतली. सकाळी सव्वानऊ वाजता सोहळा दुपारच्या भोजन व विश्रंतीसाठी यमाई शिवरीकडे मार्गस्थ झाला. दरवर्षी सोहळ्यात बोरावके मळा येथे हिरवीगार फळाफुलांची दिसणारी राने यावर्षी मात्र उजाड माळरान वाटत होती. अशा उजाड वातावरणातच सोहळा सकाळी सव्वा अकरा वाजता यमाई शिवरी येथे पोहोचला. येथे वारकर्‍यांनी भोजन व विश्रंती घेतली. दुपारी 2 वाजता सोहळा भोजन व विश्रंतीनंतर जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी 3.30 वाजता तो साकुर्डे येथे पोहोचला. जेजुरी समीप येताच दिंड्या दिंड्यांमधून मल्हारीचे गुणगान करणारे संतांचे अभंग गायले जात होते. वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. टप्पा लहान असल्याने वारकरी न थकता मार्गक्रमण करीत होते.

जेजुरीनगरीत माउलींचे अश्व सायंकाळी 4.45 वाजता तर पालखी सोहळा सायंकाळी 5.15 वाजता जेजुरी हद्दीत पोहोचला. जेजुरीचे नगराध्यक्ष अविनाश भालेराव, उपाध्यक्ष जयदीप बारभाई, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, मुख्य अधिकारी दिनेश पारगे व नगरसेवक व नगरवासियांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करीत सोहळ्याचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. त्यानंतर सोहळा जेजुरी नाक्याजवळ पोहोचला. कॉर्नरवर सोहळ्याचे स्वागत मल्हारी मार्तड देवस्थान समितीच्यावतीने अध्यक्ष अँड. किशोर म्हस्के, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, अँड. दशरथ घोरपडे, अँड. वसंत नाझीरकर, संदीप घोणे, माजी आमदार अशोकराव टेकवडे यांच्यासह विश्वस्त व भाविकांनी बेलभंडार्‍याची मुक्तपणे उधळण करून केले. या बेलभंडार्‍यात माउलींसह अवघे वैष्णवजन न्हाऊन निघाले होते. पिवळ्याधमक भंडार्‍यात माउलींचा सोहळा सोन्यासारखा चमकत होता. येथील स्वागत स्वीकारून सोहळा नवीन पालखी तळाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी सव्वासहा वाजता समाजआरतीनंतर सोहळा जेजुरी मुक्कामी विसावला. आज   हा सोहळा सकाळी वाल्हे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi